महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने २२ ते २६ डिसेंबर या कालावधीत आयोजित ‘रंगमहोत्सवा’मध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पाच दर्जेदार नाटके पाहावयास मिळणार आहेत. ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे दररोज सायंकाळी साडेसात वाजता हा महोत्सव होणार असून ज्येष्ठ रंगकर्मी आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे (एनएसडी) माजी संचालक वामन केंद्रे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
हेही वाचा >>>पुणे: शनिवारवाडा परिसरात पोलीस असल्याच्या बतावणीने पादचारी तरुणाला लुटले
या महोत्सवात चेन्नई येथील निशा थिएटर संस्थेचे ‘अरुंधती’ हे इंग्रजी, तालीम थिएटर अँड फिल्म्स या संस्थेची निर्मिती असलेले गो. पु. देशपांडे यांचे ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’, दिल्ली येथील दि ट्रायलॉग कंपनीचे ‘तानसेन’ हे संगीत नाटक, मुंबईच्या ‘एकजूट थिएटर’ संस्थेचे जुही बब्बर-सोनी लिखित
दिग्दर्शित ‘विथ लव्ह, आप की सैयारा’ आणि ‘अरण्य थिएटर्स, मुंबई’ निर्मित ‘रंगाई’ ही नाटके या महोत्सवात सादर होणार आहेत.
हेही वाचा >>>पुणे: एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन युवतीवर गुंडाकडून हल्ला; हडपसर भागातील घटना
या महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात २६ डिसेंबर रोजी महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे ‘अधिष्ठाता पुरस्कार’ ज्येष्ठ नेपथ्यकार श्याम भूतकर यांना तर दामले कुटुंबियांतर्फे दिला जाणारा ‘डॉ. रवींद्र दामले स्मृती पुरस्कार’ तळेगांव येथील ‘कलापिनी’ या नाट्यसंस्थेस ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तर, ‘दिग्दर्शक आणि नाटक’ या विषयावर २५ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे आपले विचार मांडणार आहेत. या महोत्सवात मूळ नाट्यप्रयोगाआधी दररोज सायंकाळी सात वाजता होणाऱ्या सादरीकरणांमध्ये ‘नांदी’ चा प्रवास उलगडत जाणार आहे.