पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात ऑगस्ट महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या १४ दिवसांत १२ जणांना डेंग्यूची लागण झाली असून, एकूण रुग्णसंख्या ३३ झाली आहे, तर मलेरियाचे २७ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यू, मलेरियासारखे कीटकजन्य आजार रोखण्यासाठी सात लाख घरांची तपासणी करण्यात आल्याचे महापालिकेने सांगितले.
पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणात डासोत्पत्ती होते. डासांच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. पिंपरी-चिंचवडमध्ये जून महिन्यात दोन, जुलै महिन्यात १९ डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. ऑगस्ट महिन्यात आत्तापर्यंत ११ हजार ५८० तापाचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये डेंग्यूच्या ३१७ संशयित रुग्णांपैकी १२ जणांचा अहवाल सकारात्मक आला आहे. तर मलेरियाचे दोन रुग्ण आढळले आहेत. मलेरियाच्या सकारात्मक रुग्णांची एकूण संख्या २७ वर पोहोचली आहे.
कीटकजन्य व जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सहा लाख ७७ हजार २२२ घरे, ३६ लाख चार हजार ७२१ कंटेनर, एक हजार ४९५ भंगार दुकाने, एक हजार ८१२ बांधकाम स्थळांची तपासणी करण्यात आली. त्यांपैकी डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असलेल्या तीन हजार ७०६ ठिकाणी नोटीस बजावण्यात आल्या. ८३३ नागरिक व आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करून २९ लाख ८० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
११,४९० घरांच्या परिसरात डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण
महापालिकेने सहा लाख ७७ हजार २२२ घरांची तपासणी केली. त्यांपैकी ११ हजार ४९० घरांच्या परिसरात डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असल्याचे आढळून आले. ३६ लाख ४ हजार ७२१ कंटेनर तपासण्यात आले असून, त्यातील १२ हजार ४४५ कंटेनरमध्ये डास वाढीसाठी पोषक वातावरण होते. एक हजार ४९५ भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली. एक हजार ८१२ बांधकाम स्थळांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये साचलेले पाणी व अस्वच्छता असल्याचे निदर्शनास आले.
डेंग्यू आणि मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेकडून सर्व स्तरांवर उपाययोजना सुरू आहेत. शहरातील ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. त्या भागावर विशेष लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश आरोग्य आणि वैद्यकीय विभागांना दिले आहेत. डेंग्यू, मलेरियाच्या अनुषंगाने राबवण्यात येत असलेल्या जनजागृती मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. तसेच लक्षणे आढळल्यास तत्काळ महापालिकेच्या रुग्णालयात संपर्क साधावा. – विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका