पुणे : देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या यंदा जानेवारी ते मार्च या कालावधीत ५१.७० टक्क्याने वाढली आहे. या कालावधीत ३ कोटी ७५ लाख प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे. मागील वर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान विमान प्रवाशांची संख्या २ कोटी ४७ लाख होती. याचवेळी प्रवाशांच्या तक्रारीत चालू वर्षी मोठी घट नोंदवण्यात आली आहे.

नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने हा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, जानेवारी ते मार्च या कालावधीत ३ कोटी ७५ प्रवाशांनी देशांतर्गत विमान प्रवास केला. मागील वर्षी २०२२ मध्ये याच कालावधीत ही संख्या २ कोटी ४७ लाख होती. त्याआधीच्या वर्षात २०२१ मध्ये ही संख्या ३ कोटी ५४ लाख होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विमान प्रवाशांच्या संख्येत ५१.७० टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

हेही वाचा – अन्य मंडळांच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची औपचारिकता; मराठी विषयाचे मूल्यमापन श्रेणी स्वरुपात करण्याचा निर्णय

प्रवाशांच्या तक्रारीतही यंदा मोठी घट नोंदवण्यात आली आहे. मागील वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत १ हजार ६८४ प्रवाशांनी तक्रारी केल्या होत्या. यंदा याच कालावधीत केवळ ३४७ प्रवाशांनी तक्रारी केल्या आहेत. तक्रारींचे निराकरण करण्याचे प्रमाण सुमारे ९९ टक्क्यांवर पोहोचले आहे. हे प्रमाण जानेवारी ते मार्च २०१९ या कालावधीत ९३.५ टक्के होते. प्रवाशांच्या तक्रारींमध्ये सर्वाधिक ३८.६ टक्के तक्रारी विमानातील आहेत. त्याखालोखाल सामानासंदर्भात २२.२ टक्के, परताव्यासंबंधी ११.५ टक्के आणि इतर ११.५ टक्के आहेत, असे अहवालात म्हटले आहे.

सर्वाधिक हिस्सा इंडिगोचा

देशांतर्गत विमान प्रवासी वाहतुकीत सर्वाधिक ५५.७ टक्के हिस्सा इंडिगो कंपनीचा आहे. त्याखालोखाल एअर इंडिया ९, विस्तारा ८.८, गो एअर ७.८, एअर एशिया ७.३, स्पाईस जेट ६.९, आकासा एअर ३ टक्के हिस्सा आहे. वेळेवर विमानांचे उड्डाण होण्याच्या आधारे वक्तशीरपणा ठरवण्यात आला असून, त्यात आकासा एअर, इंडिगो, विस्तारा, एअर इंडिया, एअर एशिया या कंपन्या आघाडीवर आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने ८१ लाखांची फसवणूक

देशांतर्गत विमान प्रवासी

  • जानेवारी ते मार्च २०२२ : २ कोटी ४७ लाख
  • जानेवारी ते मार्च २०२३ : ३ कोटी ७५ लाख