पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाने गेल्या आर्थिक वर्षात विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. प्रवासी विमानात आणि मालवाहतुकीत (कार्गो) मोठी वाढ झाली आहे, अशी माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरणांतर्गत (एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया – एएआय) पुणे विमानतळ प्रशासनाने गुरुवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १.०४५८ कोटी प्रवाशांनी विमानतळाचा वापर केला आहे. यात ९.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. विमान वाहतुकीचे प्रमाण ७.५ टक्क्यांनी वाढून ६८,८३० वर पोहोचले असून, मालवाहतूक ११.८ टक्क्यांनी वाढून ४२,२९० टन झाली आहे. मे महिन्यात ९.३८ लाख प्रवाशांची हवाई वाहतूक करून पुणे विमानतळाने आतापर्यंतचा सर्वाधिक मासिक प्रवासी विक्रम नोंदवला. दरम्यान, मालवाहतुकीतही सातत्याने वाढ होत असून जून २०२३ मध्ये २,६५४ टन असलेली वाहतूक मे महिन्यात ४,२०० टनांवर गेली आहे.
विमानतळ परिसरात हवाई प्रवाशांच्या सुकर प्रवासासाठी नव्याने टर्मिनलचा याचा मोठा फायदा झाला आहे. या टर्मिनलचे उद्घाटन १० मार्च २०२४ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. सुमारे ५२ हजार चौरस मीटरच्या या टर्मिनलमध्ये दर वर्षी ९५ लाख प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता असून, तासाभरात २,३०० प्रवासी सुलभ प्रवास करत आहेत. या टर्मिनलमध्ये ३४ ‘चेक-इन’ यंत्रणा, १५ लिफ्ट, ८ सरकते जिने, १० वातानुकूलित हलते पूल, ‘स्मार्ट डॉकिंग सिस्टिम’, प्रवासी साहित्य-पिशव्या तपासणी आणि वाहून नेहणारी यंत्रणा आणि सुरक्षा तपासणीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय दळणवळण सुविधेत वाढ झाली असून, पुण्याहून दुबई आणि बँकॉकसाठी थेट विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच, सिंधुदुर्ग, नांदेड, जळगावसारख्या शहरांशीही हवाई संपर्क जोडल्याने ही शहरे आणखी जवळ आली असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.
नवीन टर्मिनल, सुधारित सुविधांसह पुणे विमानतळ महत्त्वाचे हवाई केंद्र बनले आहे. प्रवाशांना आणखी सुलभ सुविधा देण्यासाठी विमानतळ प्रशासन प्रयत्नशील आहे. – संतोष ढोके, संचालक, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ