मार्केट यार्डातील घाऊक फळभाजी बाजारात मटार, कारली, हिरवी मिरची, फ्लॅावर, दोडका, काकडी या फळभाज्यांच्या दरात वाढ झाली. ढोबळी मिरचीच्या दरात घट झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (२१ ऑगस्ट) राज्य; तसेच परराज्यांतून १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक वाढली आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून १० ते १२ ट्रक हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून ३ ते ४ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो घेवडा; तसेच ५ ते ६ टेम्पो कोबी, इंदूरहून ७ ते ८ टेम्पो गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून १० ते १२ ट्रक लसूण, आग्रा, इंदूरमधून मिळून ४५ ट्रक बटाटा अशी आवक परराज्यांतून झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

हेही वाचा – पवना धरण पूर्णपणे भरले ; पिंपरी-चिंचवडची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली

पुणे विभागातून सातारी आले एक हजार ते १२०० गोणी, कोबी ४ ते ५ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ७ ते ८ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, टोमॅटो १० ते १२ हजार पेटी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, कांदा १०० ट्रक अशी आवक बाजारात झाली.

पालेभाज्या महाग

पावसामुळे पालेभाज्यांच्या प्रतवारीवर परिणाम झाला असून आवक कमी झाली. पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली असून चांगल्या प्रतीच्या पालेभाज्यांना मागणी आहे. कोथिंबिर, मेथी, शेपू, कांदापात, चाकवत, करडई, राजगिरा, चुका, पालक या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. पुदिना, अंबाडी, मुळा या पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात काेथिंबिरीच्या एक लाख जुडी; तसेच मेथीच्या ४० हजार जुडींची आवक झाली.

हेही वाचा – पुणे : लक्ष्मी रस्त्यावर व्यावसायिकाला लुटले

डाळिंब, कलिंगड, पपई, खरबूज महाग

श्रावण महिन्यातील उपवासासाठी फळांना मागणी वाढली आहे. डाळिंब, कलिंगड, पपई, खरबूजच्या दरात वाढ झाली आहे. लिंबे, सीताफळ, चिकू, अननस, माेसंबी, संत्र्याचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात लिंबे दोन ते अडीच हजार गोणी, डाळिंब ३५ ते ४० टन, पपई ८ ते १० टेम्पो, कलिंगड ३ ते ४ टेम्पो, खरबूज १ ते २ टेम्पो, चिकू एक हजार खोकी, सीताफळ १५ ते २० टन, संत्री ३ ते ४ टन, मोसंबी ६० ते ७० टन, पेरू ५०० ते ७०० क्रेट्स (प्लास्टिक जाळी) अशी आवक फळबाजारात झाली.

झेंडूची आवक वाढली

श्रावण महिन्यामुळे फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. झेंडू आणि शेवंतीची आवक वाढली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत फुलांच्या दरात घट झाल्याची माहिती फूल बाजारातील व्यापारी सागर भोसले यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in the price of peas carli chilli dodka flower decrease in the price of chilli pune print news amy
First published on: 21-08-2022 at 17:09 IST