समाधानकारक पावसामुळे भात उत्पादनात वाढ; भावातही घट होण्याची शक्यता
पुणे : देशभरात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने भाताची लागवड चांगली झाली आहे. देशात भाताच्या धानाची लागवड ३९० लाख हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली आहे. यंदाच्या हंगामात तांदळाचे उत्पादन मुबलक होऊन दरातही घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
भाताचे मुबलक उत्पादन झाल्यास भावात घट होण्याची शक्यता मार्केट यार्डातील तांदळाचे व्यापारी जयराज अँड कंपनीचे संचालक आणि फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (फॅम)चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, साधारणपणे मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर देशभरातील भात उत्पादक शेतकरी लागवडीस सुरुवात करतात. लागवड झाल्यानंतर दोन ते अडीच महिन्यांत भाताचे पीक हाती येते. भाताच्या लागवडीस कमी कालावधी लागतो. त्यामुळे देशभरातील शेतकरी भात लागवडीला प्राधान्य देतात. भाताच्या लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. यंदाच्या हंगामात सुद्धा देशात भाताची लागवड विक्रमी झाली आहे.
गेल्या वर्षी देशभरात भाताची लागवड ३५४.५० लाख हेक्टर क्षेत्रावर झाली होती. त्यातून तांदळाचे उत्पादन ११ लाख ७५ हजार टन एवढे मिळाले होते. गेल्या वर्षीचे उत्पादन गेल्या पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत दहा टक्क्यांनी अधिक आहे. यंदाच्या हंगामात संपूर्ण देशभरात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे भात धान लागवडीचे प्रमाण दहा टक्क्य़ांनी वाढले आहे. लागवड वाढल्यानंतर साहजिकच सर्व प्रकारच्या तांदळाच्या दरात घट होईल, असे त्यांनी नमूद केले.
उत्तरेकडील राज्यांत अधिक उत्पादन : पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांत भाताची विशेषत: बासमतीची मोठय़ा प्रमाणावर लागवड केली जाते. बासमती तांदळाची निर्यात संपूर्ण जगभरात करण्यात येते. देशातील अन्य राज्यात भाताची लागवड केली जाते. मात्र, उत्तरेकडील राज्यात मोठे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा, नाशिक परिसर, कोल्हापूर तसेच कोकणपट्टीत भाताची लागवड केली जाते. मात्र, उत्तरेकडील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील भात लागवडीचे प्रमाण कमी आहे.
वर्ष भात लागवड क्षेत्र तांदूळ उत्पादन
२०१७-१८ ३६८ लाख हेक्टर ११.२५ लाख टन
२०१८-१९ ३७२ लाख हेक्टर ११. ६५ लाख टन
२०१९-२० ३५४ लाख हेक्टर ११.५५ लाख टन
२०२०-२१ साधारण ३९० साधारण लाख हेक्टर १२ लाख टन
