पुणे : ‘कोणत्याही निवडणुकीपूर्वी सर्वेक्षण केले जाते. सर्वेक्षणात ज्याचे नाव पुढे येते त्याला व्यक्तीला उमेदवारी दिली जाते. इंदापूरमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात भरत शहा यांचे नाव आघाडीवर राहिले. त्यामुळेच नगराध्यक्षपदासाठी त्यांना उमेदवारी देण्यात आली,’ असे राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भरत शहा यांच्या उमेदवारी अर्जाबाबत भाष्य केले.
इंदापूर नगरपरिषदेसाठी भरत शहा यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पदाचा राजीनामा देऊन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर कृषी महाविद्यालयात आयोजित नैसर्गिक शेती परिषदेचे उद्घाटन कार्यक्रमानंतर भरणे यांच्याकडे त्यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी स्पष्टीकरण दिले.
भरणे म्हणाले, ‘इंदापूर शहरासाठी शहा कुटुंबियांचे योगदान मोठे आहे. शहा कुटुंबातील विविध सदस्यांनी इंदापूर शहरातील मोठी पदे भूषवली आहेत. त्यांना सहकार क्षेत्राचा अनुभव आहे. बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सर्वेक्षणात त्यांचे नाव पुढे आल्याने त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे गारटकर नाराज झाले असावेत. निवडणुकीत विजय-पराभव होतच असतो. मात्र सर्वेक्षणातून जे नाव पुढे येते ते पक्षाला मान्य करावे लागते.’
‘पक्षनिष्ठेला महत्त्व आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहा कुटुंबियांनी मला सहकार्य केले. त्यांच्या मनात नसेल तर त्यांनी माझे काम केले नसते, असेही भरणे म्हणाले.
गारटकर यांच्याकडून करण्यात आलेल्या टीकेबाबत भरणे म्हणाले, गारटकर कालही आमचे नेते होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. मात्र कुणावर खापर फोडण्यात अर्थ नसतो. लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे.
‘एकत्र येण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर’
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यासंदर्भात भरणे म्हणाले,‘याबाबत उपमुख्यमंंत्री अजित पवार उत्तर देतील. कार्यकर्ते संभ्रमात नाहीत. या निवडणुका स्थानिक पातळीवरील असून निर्णय स्थानिक स्तरावर घेतले जातात. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांना जे योग्य वाटते त्याप्रमाणे भूमिका घेतली जाईल.’
