मार्केट यार्डातील हमाल, तोलणार, कामगारांच्या विविध मागण्यांसाठी हमाल पंचायतीकडून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपोषणास कामगार युनियन, टेम्पो पंचायत, महात्मा फुले संघटना, किरकोळ व्यापारी संघटनेने पाठिंबा दिला आहे़. या वेळी संतोष नांगरे, संजय सासटे, राजू पवार, विष्णू गरजे, चंद्रकांत मानकर, विनोद शिंदे, विनायक ताकवले, दत्ता डोंबाळे आदी उपस्थित होते. हमाल पंचायतीचे गोरख मेंगडे, हनुमंत बहिरट, राजेंद्र चोरघे, किशोर भानुसघरे आदी उपोषणात सहभागी झाले आहेत. हमाली दरवाढीचे करार गेल्या दोनतीन वर्षांपासून झालेले नाही. पुणे माथाडी मंडळात २४ नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. काही करार मान्य करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>पिंपरी : अगरबत्तीच्या कंपनीला भीषण आग; घटनास्थळाच्या बाजूला असलेल्या शाळेतील २०० विद्यार्थ्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

भुसार बाजारातील तोलणार कामगारांचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. वेष्टानाधित मालावर (पॅकिंग) तोलाई आकारली जात नसल्याने भुसार बाजारातील तोलणारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या चार वर्षांपासून भुसार बाजारातील तोलणारांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. तत्कालीन पणनमंत्री, बाजार समिती, कामगार प्रतिनिधींच्या बैठकीत भुसार बाजारातील तोलणारांना अन्य ठिकाणी काम देऊन त्यांची उपासमार थांबवावी, असे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार बाजार समितीने भुसार बाजारातील दहा तोलणार कामगारांना न्यायालयीन निकाल लागेपर्यंत भाजीपाला बाजारात तात्पुरत्या स्वरूपात तोलाईचे काम देण्याचे आदेश दिले होते.

माथाडी मंडळाच्या नियमानुसार एका टोळी(गट)तून दुसऱ्या टोळीत समाविष्ट करण्यासाठी एक तृतीयांश कामगारांच्या सह्या लागतात. या सह्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पुणे माथाडी मंडळाने त्याची पडताळणी करून २४ नोव्हेंबर रोजी नोटिसद्वारे संबंधित तोलणार कामगारांना त्यांच्या सह्यांबाबत म्हणणे मांडण्यासाठी पुणे माथाडी येथील कार्यालयात येण्यास सांगितले होते. भुसार बाजारातील तोलणारांना भाजीपाला बाजारात काम करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, एका संघटनेच्या दबाबाखाली त्यांना भाजीपाला बाजारात वर्ग केले जात नसल्याचा आरोप हमाल पंचायतीकडून करण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indefinite hunger strike by the hamal panchayat for various demands in market yard pune print news rbk 25 zws
First published on: 06-12-2022 at 14:02 IST