पुणे : फिलिपिन्समध्ये झालेल्या ३६व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी केली. भारतीय संघाने दोन सुवर्ण आणि दोन रौप्य अशी एकूण चार पदके पटकावली असून, या संघात मुंबईतील वेदांत साक्रे याने सुवर्णपदक पटकावले.

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राने ही माहिती दिली. २० ते २७ जुलै दरम्यान, फिलिपिन्समधील क्युझॉन येथे आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड झाली. यंदाच्या स्पर्धेत ७७ देशांतील २९८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

स्पर्धेत एकूण ३० सुवर्ण, ६० रौप्य, ८९ कांस्यपदके वितरित करण्यात आली. त्यात राजकोटच्या रुद्र पेतानी, मुंबईच्या वेदांत साक्रे यांनी सुवर्णपदक, तर हरियाणाच्या भव्या गुंवाल, कोलकाता येथील सुभ्रोजित पॉल यांनी रौप्यपदक मिळवले. स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या दहा स्पर्धकांमध्ये रुद्र पेतानी याने स्थान मिळवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संघाला प्रा. पुरुषोत्तम काळे, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे विक्रांत घाणेकर, डॉ. मयूरी रेगे, ऑर्ट्रिया विद्यापीठाचे, सेंट झेवियर्स महाविद्यालयाचे सचिन राजगोपालन यांनी मार्गदर्शन केले.या स्पर्धेच्या पदकतालिकेत भारताने पाचवे स्थान मिळवले. चीन आणि सिंगापूरने प्रत्येकी चार सुवर्ण पदके, तर अमेरिका, इराण यांनी प्रत्येकी तीन, तुर्की आणि रशिया यांनी प्रत्येकी दोन सुवर्णपदके मिळवली. पेशी आणि आण्विक जीवशास्त्र, जैववैद्यकीयशास्त्र, परिसंस्था व वर्गीकरणशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र या विषयांचा स्पर्धेत समावेश होता.