पुण्यात आयपीएल क्रिकेट सामन्यादरम्यान मैदानात जाणं एका प्रेक्षकाला चांगलाच महागात पडलं आहे. या प्रकरणी तरुणाला तळेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. दशरथ राजेंद्र जाधव वय- २६ असं या प्रेक्षकाचं नाव आहे. मुख्य मैदानाच्या बाहेर प्रेक्षक आत जाऊ नयेत म्हणून तारेचे कुंपण करण्यात आले. त्याला ओलांडून तो विराट कोहलीकडे गेला त्याच्याशी हस्तांदोलन केले तर रोहित शर्माच्या दिशेने धावत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. ही घटना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पुण्यातील MCA क्रिकेट मैदानावर आरसीबी विरुद्ध मुंबई इंडियन्स क्रिकेटचा सामना पार पडला. सामन्यादरम्यान क्रिकेट चाहता दशरथ ला मैदानात जाण्याचा मोह आवरता आला नाही. दशरथ ने तारेचे कुंपण ओलांडून विराट कोहली कडे गेला त्याच्याशी हस्तांदोलन करत पुढे रोहित शर्माकडे धावत असताना त्याला सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी ताब्यात घेतलं.
पोलीस आणि सुरक्षा रक्षकांची धावपळ झाली. दशरथला मैदानाबाहेर आणलं. मैदानाबाहेर येताच दशरथने पोलिसांशी हुज्जत घालत पोलिसांच्या अंगावर धावून गेला. या प्रकरणी दशरथला तळेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.