पुणे : भारतीय रेल्वेने स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केलेली ‘कवच’ ही स्वयंचलित रेल्वे सुरक्षा प्रणाली मध्य रेल्वेच्या ७५० हून अधिक रेल्वे चालकांच्या इंजिनमध्ये (लोकोमोटिव्ह) बसविण्यास रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे.
रेल्वे प्रवाशांचा प्रवास यामुळे अधिक सुरक्षित होणार आहे. सोलापूर विभागातील धवळस ते भाळवणी या २६ किलोमीटर रेल्वे मार्गिकेवर ‘कवच’ या स्वयंचलित प्रणालीची चाचणी नुकतीच घेण्यात आली. त्यामध्ये थांब्यावर लोकल रेल्वे धोकादायकपणे सिग्नल ओलांडण्याबाबत (सिग्नल पास ॲट डेंजर), अचानक थांबा निर्माण करणे (ब्लाॅक सेक्शन एसओएस), स्थानक प्रमुखाद्वारे थांबा निर्माण करणे (स्टेशन मास्टर एसओएस) आणि रुळ बदलताना रेल्वेची गती सुनिश्चित करणे (टर्नआउट्स ओव्हरस्पीड) या प्रकारच्या चार आधारांवरील चाचण्या यशस्वी पार पडल्या. त्यामुळे रेल्वे सुरक्षिततेत वाढ होऊन, सुरक्षित गाडीसंचलनाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.
त्याचबरोबर भविष्यातील तंत्रज्ञानासाठी संपूर्ण परिसंस्था तयार करून प्रगत सुरक्षा नियमांची काटेकोर प्रशिक्षण व अंमलबजावणी यासाठीची बांधिलकी निश्चित केल्याची माहिती रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी दिली.
काय आहे ‘कवच’ प्रणाली ?
देशी बनावटीची ‘कवच’ ही स्वयंचलित रेल्वे सुरक्षा प्रणाली आहे. रेल्वे आणि प्रवासी यांची सुरक्षितता वाढविण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित युनिटच्या माध्यमातून रेडिओ तरंग लहरीद्वारे धोक्याची पूर्वसूचना निश्चित करून ही प्रणाली माहिती देते. तंतोतंत आणि अचूक माहितीचे ही प्रणाली आदानप्रदान करते. धावत्या रेल्वेला सिग्नल मिळाला नसताना पुढे धोका निर्माण झाला, तरी त्याचे पूर्वानुमान स्वयंप्रकारे लावून वेगमर्यादा अंमलात आणते. त्यामुळे रेल्वे परिचालन आणि सुरक्षित व कार्यक्षम होत आहे.
काय फायदा होणार ?
- रुळ बिघाड किंवा ओलांडत असताना अपघात परिस्थितीची पूर्वकल्पना
- अतिवेग, रेल्वे टक्कर यांसारख्या जोखमींना प्रतिबंध
- आपत्कालीन परिस्थितीत आपोआप ब्रेक लागणार
- रुळ ओलांडताना वेग मर्यादेवर संतुलन त्यामुळे प्रवासाची गती वाढणार – प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुकर आणि जलद प्रवास
भारतीय रेल्वेची संचलन कार्यक्षमता वाढवणे आणि रेल्वे संचालनातील सुरक्षा उपाय सक्षम करते. संपूर्ण परिसंस्था तयार करून प्रगत सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून प्रवाशांना उत्तम सेवा प्रदान केली जाणार आहे. – धर्मवीर मीना, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे विभाग