देशातील ५० टक्के कुटुंबांना अनाठायी खर्चाचा आजार

पुणे : आजारांपासून बरे होण्यासाठी औषध हवे हे खरे, मात्र औषधे घेणे हाच नवा आजार ठरू पाहत असल्याचे जागतिक स्तरावरील पाहणीतून दिसून येत आहे. त्यामुळे औषध सेवन कमी करण्याचे नवे आव्हान जगासमोर आहे. भारतात तब्बल ५० टक्के कुटुंबे आपल्या उत्पन्नातील मोठा भाग औषधांच्या खरेदीवर तसेच अनावश्यक रोगनिदान चाचण्यांवर खर्च करतात. कुटुंबातील सदस्य दररोज पाचपेक्षा अधिक औषधे घेतात, असे एका पाहणीतून स्पष्ट झाले आहे.

इंग्लंडचे चीफ फार्मास्युटिकल ऑफिसर किथ रिज, सिडनी विद्यापीठ आणि मॉन्ट्रिअल विद्यापीठाच्या संशोधनात जगभरामध्ये पॉलिफार्मसी ही समस्या सध्या डोके वर काढत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पॉलिफार्मसी म्हणजे दररोज पाच औषधांचे सेवन करणे होय. एकाचवेळी विविध आजारांनी ग्रासलेल्या ज्येष्ठांमध्ये हे प्रमाण लक्षणीय असते. तसेच, तरुण वयात असंसर्गजन्य आजारांचा सामना करणाऱ्यांमध्येही अतिरिक्त औषध सेवन ही समस्या आहे.  त्यामुळे औषधांच्या जाहिरातींवर निर्बंध आणण्याची मागणीही होत आहे.

जगात काय?

ऑस्ट्रेलियामध्ये तब्बल ३६ टक्के नागरिक अतिरेकी औषध सेवन करतात. इंग्लंडमध्ये १५ टक्के नागरिक अतिरिक्त औषधे घेतात. आठ टक्के नागरिक हाय डोस प्रकारातील औषधे घेत असल्याचे समोर आले आहे. यावर मार्ग काढण्यासाठी टप्प्याटप्प्याने औषधे कमी करणे किंवा बंद करणे ही प्रक्रिया स्वीकारली जात आहे.

निरीक्षण काय?

आयुर्वेदिक, हर्बल, युनानी अशा विविध पॅथींची औषधे भारतात एकाच वेळी घेतली जातात. औषधे घेताना फार्मसिस्ट आणि डॉक्टर यांच्याबरोबर चर्चा करणे, माहितीची देवाणघेवाण या गोष्टी होत नाहीत. त्यामुळे अनेकदा दोन वेगळ्या पॅथींमधली औषधेही एकत्र घेतली जातात. त्यातून एखाद्या औषधाचा अपेक्षित परिणाम दिसत नाही.

अतिरेकी सेवनाचा परिणाम

औषधांचा अतिरेकी वापर किंवा गैरवापर सेवन करणाऱ्याच्या शरीरावर दुष्परिणाम करतो. अतिरेकी सेवनामुळे कालांतराने विशिष्ट औषधे निष्प्रभ ठरण्याचा धोकाही आहे. सामाजिक वर्तनाचा दबाव तसेच जाहिरातींचा भडिमार यांमुळे अतिरेकी औषध सेवन होत असल्याचा निष्कर्ष या संशोधनातून मांडण्यात आला आहे.

रुग्ण, ग्राहकांची जागरूकता आवश्यक

भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. आत्माराम पवार म्हणाले,की भारतात औषधांचा वापर वाढण्याचे मुख्य कारण वाढत्या वयाबरोबर उद्भवणारे आजार हे आहे. हे चित्र बदलण्यासाठी औषधे घेताना आपण घेत असलेल्या इतर औषधांची माहिती फार्मसिस्टला देणे, त्यांच्या एकत्र सेवनाचे संभाव्य परिणाम-दुष्परिणाम यांची चर्चा करणे आवश्यक आहे. रुग्ण म्हणून ग्राहकांनी थोडी अधिक सजगता दाखवल्यास औषधांच्या दुष्परिणामांचा धोका टळेल, असेही डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.