राहुल खळदकर

‘सुवासिक इंद्रायणी तांदळाचे कोठार’ अशी ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात आता इंद्रायणीचा हंगाम सुरू झाला आहे. यंदा इंद्रायणीचे पीक परतीच्या पावसाच्या तडाख्यातून बचावल्याने चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे. त्यामुळे तांदळाचे दरही ५० ते ६० रुपयांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

यंदा मावळ तालुक्यात इंद्रायणीची लागवड चांगल्या प्रकारे झाली. गेल्या वर्षी भात काढणीच्या वेळी आलेल्या पावसामुळे नुकसान झाले होते. यंदा पावसाचा तडाखा बसला नाही. त्यामुळे उत्पादनही चांगले झाले आहे, अशी माहिती मावळ तालुका कृषी अधिकारी संताजी जाधव यांनी दिली.
मावळमध्ये २० ते २५ वर्षांपूर्वी इंद्रायणी तांदळाची लागवड सुरू झाली. गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील शेतकऱ्यांचा इंद्रायणी लागवडीकडे कल वाढला आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील तुंग, शिळीम, मोरवी, येळसे, कोथुर्णी, वारू, लोहगड, घालेवाडी, इंदोरी परिसरातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने इंद्रायणीची लागवड करतात. चांगल्या प्रतीचे बियाणे आणि खतांचा वापर करण्यात येतो. जुलैच्या पहिल्या आठवडय़ात लागवड केली जाते. मावळ तालुक्यात साधारणपणे १२०० ते १२५० हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. त्यापैकी ९०० ते ९५० हेक्टर क्षेत्रावर इंद्रायणीचे पीक घेतले जाते.
दसरा, दिवाळीच्या आसपास इंद्रायणीची कापणी सुरू केली जाते. पूर्वी पारंपरिक पद्धतीने कापणी केली जात असे. आता यांत्रिक तसेच पारंपरिक पद्धतीने कापणी आणि झोडणी केली जाते. व्यापारी आणि शेतकरी भाताची खरेदी करतात. गिरणीत प्रक्रिया केल्यानंतर तांदळाची विक्री केली जाते.
ऑक्टोबरमध्ये भातबियाणे निवडले जाते. त्यात अन्य जातीच्या बियाण्यांची भेसळ आढळल्यास त्यातून अस्सल इंद्रायणीचे बियाणे वेगळे केले जाते. इंद्रायणी तांदळाचे एकरी ४० पोती उत्पादन मिळते. एका पोत्यात ७० किलो तांदूळ मावतो, असे मावळ तालुक्यातील शेतकरी ज्ञानेश्वर ठाकर यांनी सांगितले.

शेतकऱ्यांकडून थेट खरेदी
किरकोळ बाजारात इंद्रायणी तांदळात भेसळ करण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पुणे, मुंबई, ठाणे परिसरांतील ग्राहक मावळातील शेतकऱ्यांकडूनच इंद्रायणी तांदळाची थेट खरेदी करतात. एक किलो तांदळाचे दर ५० ते ६० रुपयांदरम्यान आहेत, असे येळसे येथील शेतकरी ज्ञानेश्वर ठकार यांनी सांगितले.

सुगंध आणि वैशिष्टय़पूर्ण चवही..
२० ते २५ वर्षांपूर्वी इंद्रायणी तांदळाचे सुगंधित वाण विकसित करण्यात आले होते. त्याची मुदत साधारपणे २० वर्षांची होती. मात्र, त्यात बदल करून इंद्रायणीचे नवे वाण विकसित करण्यात आले. केवळ सुगंधच नाही, तर जिभेवर रेंगाळणारी वैशिष्टय़पूर्ण चव यामुळे अल्पावधीतच इंद्रायणी तांदूळ लोकप्रिय ठरला.

विपणनाची गरज..
सुगंधित इंद्रायणी तांदळाची माहिती परराज्यातील आणि परदेशी ग्राहकांना व्हावी यासाठी योग्य पद्धतीने विपणन (ब्रँडिंग) करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने आता मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत, असे शेतकरी ज्ञानेश्वर ठाकर यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही वर्षांपासून पाऊस उशिरा सुरू होत असल्याने इंद्रायणीची लागवड जुलैच्या पहिल्या आठवडय़ात सुरू होते. तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागातर्फे स्पर्धाही घेण्यात येते. – संताजी जाधव, कृषी अधिकारी, मावळ तालुका