पिंपरी : तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदीमधून वाहणारी आणि वारकरी संप्रदायाचे श्रद्धेचे स्थान असलेली इंद्रायणी नदी लवकरच मोकळा श्वास घेणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘इंद्रायणी’ सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्पास राज्य शासनाने सोमवारी प्रशासकीय मान्यता दिली. ५२६ कोटी रुपयांचा हा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण केला जाणार आहे.
मावळ तालुक्यातील कुरवंडे गावातून इंद्रायणी नदी उगम पावते. पुढे ती तीर्थक्षेत्र देहूगाव, आळंदी मार्गे तुळापूर येथे जाऊन भीमा नदीला मिळते. भीमा नदी पुढे मुळा-मुठा नदीला घेऊन उजनी धरण मार्गे पंढरपूरला जाते. पिंपरी-चिंचवड शहरातून १८.८० किलोमीटर नदीचे पात्र आहे. नदी शहरात येताच अनेक गटारी, नाले नदीत थेट मिसळतात. त्यामुळे नदीचा रंग बदलू लागतो. निर्मळ पाण्याला नाल्याचे रूप येते. इंद्रायणीत जलपर्णी दिसते. कुदळवाडी नाल्यातून औद्योगिक कंपन्यांमधील रसायनमिश्रित पाणी नदीत मिसळते. त्यामुळे महापालिकेने ‘इंद्रायणी’ सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्प आखला. त्याला राज्यस्तरीय तांत्रिक समितीने सप्टेंबर महिन्यात मान्यता दिली. आता प्रशासकीय मान्यता मिळाल्याने महापालिका हद्दीतील नदीपात्राचे पुनरुज्जीवन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पाणी साठवण्यासाठी जलनिस्सारण प्रणाली
या प्रकल्पातून नदीसंवर्धन, पूरनियंत्रण, पाण्यावर प्रक्रिया आणि सुशोभीकरण अशा चारही बाबी साध्य केल्या जाणार आहेत. पावसाचे पाणी साठवण्यासाठी जलनिस्सारण प्रणाली, प्रदूषित पाणी सांडपाणी प्रकल्पाकडे वळविण्यासाठी ‘इंटरसेप्टर’, पूर नियंत्रणासाठी दगडी बांधकाम, नदीच्या काठांचे सक्षमीकरण, नदीपात्राचे तटबंदीकरण, नदी तटावर हरित क्षेत्राचा विकास, वनसंवर्धनाद्वारे सुशोभीकरण अशी कामे एकत्रितपणे करण्यात येणार आहेत. चिखलीतील रिव्हर रेसिडन्सी आणि स्मशानभूमीजवळ ४० आणि २० दशलक्ष लीटर (एमएलडी) क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत.
- इंद्रायणी सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्प ५२५ कोटी ८२ लाखांचा
- केंद्र आणि राज्य शासनाचे ५० टक्के अनुदान, तीन टप्प्यांत मिळणार अनुदान
- महापालिकेचा ५० टक्के हिस्सा
‘इंद्रायणी’ सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्पास राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाईल. महापालिका हद्दीतून वाहणाऱ्या १८.८० किलोमीटर नदी पात्राचे पुनरुज्जीवन केले जाईल, असे महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.
इंद्रायणी नदी केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नसून संस्कृती, पर्यावरण आणि शहराच्या आरोग्याशी थेट जोडलेली जीवनवाहिनी आहे. या प्रकल्पाद्वारे इंद्रायणी नदीला नवजीवन मिळेल, प्रदूषणमुक्त व सुरक्षित किनारे तयार होतील. नागरिकांना हरित व सुंदर नदीकाठाचा अनुभव मिळेल, असे आमदार महेश लांडगे म्हणाले.
