बजाज उद्योग समूहाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे आज (शनिवार, १२ जानेवारी २०२२ रोजी) पुण्यात निधन झालं. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे बजाज उद्योग समूहचा आधारस्तंभ हरपला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ साली झाला होता. बजाज उद्योग समूहाला मोठे करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. जवळजवळ पाच दशकं त्यांनी कंपनीचं नेतृत्व केलं. या प्रदीर्घ कालावधीमध्ये त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आणि ते योग्य असल्याचं सिद्ध करुन दाखवलं. भारतीय वाहन उद्योग क्षेत्रातील एक आघाडीचं नाव म्हणून राहुल बजाज यांचं नाव घेतलं जातं.

२००१ मध्ये त्यांना उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. राहुल बजाज हे केवळ उद्योजक नव्हते तर ते समाजकार्यासाठीही अनेकदा मदत करायचे. २०२० साली त्यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर बजाज समुहाच्यावतीने १०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. विशेष म्हणजे २०२० मध्ये मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देशात पहिल्यांदाच करोना लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर काही दिवसांमध्येच बजाज यांनी सामाजिक बांधिलकीचं भान ठेवत ही घोषणा केली होती.

नक्की वाचा >> “सरकारला प्रश्न विचारण्याची मुभा लोकांना का नाही?”; जेव्हा भर कार्यक्रमात अमित शाहांना राहुल बजाज यांनी विचारलेला प्रश्न

या निधीचा वापर देशात आरोग्यसेवा पुरवाणाऱ्या यंत्रणांचे सबलिकरण करण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी केला जाईल असं सांगण्यात आलेलं. बजाज यांच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही समाधान व्यक्त करत या निर्णयाचं आणि राहुल बजाज यांचं कौतुक केलं होतं. “आम्ही आमच्या समुहाच्या २०० स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सरकारबरोबर काम करत असून ज्यांना मदतीची सर्वाधिक गरज आहे त्यांच्यापर्यंत मदत पोहचवण्यासाठी आम्ही काम करु,” असा विश्वास बजाज समुहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी ही मदत जाहीर करताना व्यक्त केला होता.

बजाज समुहाकडून दिला जाणारा निधी हा सरकारी रुग्णालयांमध्ये आयसीयूचा दर्जा वाढवण्यासाठी, व्हेंटीलेटर्ससाठी, चाचण्या घेण्याच्या क्षमता वाढवण्यासाठी आणि आयसोलेशन वॉर्डच्या निर्मितीसाठी वापरला जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं.

या घोषणेनंतर पवार यांनी संबंधित घोषणेचं राहुल बजाज यांची स्वाक्षरी असणारं पत्र ट्विटरवरुन शेअर केलं होतं. “माझे मित्र राहुल बजाज यांचा मी आभारी आहे. ते अशा कार्याच्या माध्यमातून देशासाठी काम करणाऱ्या बजाज कुटुंबाचा वारसा यशस्वीपणे पुढे नेत आहेत,” अशा शब्दात शरद पवार यांनी त्यांचं कौतुक केलं होतं.

जवळजवळ पाच दशक बजाज ऑटो या कंपनीमध्ये काम केल्यानंतर कार्यकारी संचालक आणि अध्यक्ष पदावरुन ते मागील वर्षी एप्रिल माहिन्यात पायउतार झाले होते. वयामुळे आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यांच्याजागी कंपनीचे कार्यकारी संचालक नीरज बजाज यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. नीरज बजाज हे १ मे २०२१ पासून बजाज ऑटोचे अध्यक्ष आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Industrialist rahul bajaj former chairman of bajaj group dies at 83 helped 100 cr during covid 19 first wave scsg
First published on: 12-02-2022 at 16:58 IST