केंद्रातील भाजप सरकारने राबवलेल्या चुकीच्या धोरणांमुळे देशात बेरोजगारी व महागाईत बेसुमार वाढ झाली आहे, अशी टीका युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनी केली.

प्रदेश युवक काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभागातील सर्व प्रदेश, जिल्हा व विधानसभा पदाधिकाऱ्यांचा मेळावा काळेवाडीतील ‘हॉटेल रागा पॅलेस’ येथे झाला, तेव्हा ते बोलत होते. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव कृष्णा अल्लावारू, युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम यांच्यासह पृथ्वीराज साठे, प्रतिमा मुदगल, वंदना बेन, कुणाल राऊत, प्रा. शिवराज मोरे, सचिन साठे, कैलास कदम, गौतम आरकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
श्रीनिवास म्हणाले की, नागरिकांमध्ये सरकारच्या विरोधात तीव्र असंतोष आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांना जगणे अवघड झाले आहे. गरजूंना ‘मदतीचा हात चोवीस तास’ या उपक्रमातून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मदत करावी. सर्व वाड्यावस्त्यांवर युवक काँग्रेसच्या शाखा सुरू करून नागरिकांशी संवाद साधावा व त्यांचे प्रश्न सोडवावेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कृष्णा अल्लावारू म्हणाले, स्वाभिमानी महाराष्ट्र कधीही इंग्रजांची माफी मागणाऱ्या सावरकर विचारधारेचे समर्थन करणार नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी करावी, असे आवाहन त्यांनी युवक कार्यकर्त्यांना केले.कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. शिवराज मोरे यांनी केले. स्वागत कौस्तुभ नवले यांनी, सूत्रसंचालन गौरव चौधरी यांनी केले. तर, डॉ. वैष्णवी किराड यांनी आभार मानले.