पुणे : समाजकल्याण विभागाच्या वतीने उच्च शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्तींसाठीचा निधी खात्याला प्राप्त झाला असून मार्च अखेर पर्यंत रखडलेल्या शिष्यवृत्तींचे वितरण केले जाईल, अशी माहिती राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी दिली.
इतर मागास बहुजन कल्याण मंत्र, दुग्धविकास आणि अपारंपारिक ऊर्जामंत्री अतुल सावे यांच्या हस्ते इतर मागास बहुजन कल्याण संचलानलायाच्या स्थलांतरीत कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी झाले. त्यानंतर त्यांनी विभागाचा आढावा घेतल्यानंतर महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) कार्यालयाच्या नव्या इमारतीची पाहणी केली. त्यावेळी पत्रकारांशी बोलतना त्यांनी शिष्यवृत्तींचे लवकरच वितरण केले जाईल, असे सांगितले. उच्च शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तींसाठीचा निधी खात्याला प्राप्त झाला आहे. त्यामुळे सर्व शिष्यवृत्तींचे मार्च अखेरपर्यंत वितरण केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग या घटकांसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत विविध ५४ कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत वसतिगृह आणि आश्रमशाळा योजनेंतर्गत विद्यार्थ्यांची उपस्थिती तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची वारंवार भेटी देऊन तपासणी करावी अशी सूचना सावे यांनी अधिकाऱ्यांना केली.
राज्यात सन २०१७ मध्ये सामाजिक न्याय विभागातून नव्याने इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्थापना झाली. गेल्या अडीच वर्षात इतर मागास बहुजन समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. १०० विद्यार्थी क्षमतेचे मुला-मुलींसाठी ५६ वसतिगृह २६ जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहेत. वसतिगृहात प्रवेश देताना जातप्रमाणपत्र पडताळणी करुनच प्रवेश देण्यात यावा. बोगस प्रमाणपत्र प्रकरणी गुन्हा दाखल करावा, असेही त्यांनी सांगितले.
ज्या जिल्ह्यात अद्याप वसतीगृहासाठी भाडेतत्त्वावर घेण्यासाठी जागा निश्चित करण्यात आलेल्या नाहीत त्या जिल्ह्यांनी तातडीने जागा निश्चित करुन प्रस्ताव सादर करावेत, विद्यार्थ्यांना भोजन भत्ता तसेच साहित्य पुरवठा प्राधान्याने करावा, वसतीगृह अनुदानाबाबत पाठपुरावा करावा असे त्यांनी सांगितले.