इंदापूर : पारंपारिक शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या निलेश च्या हातात लहानपणापासूनच गाई -गुरांच्या शेळ्यांच्या दोऱ्या  होत्या. त्या खडतर परिस्थितीशी तो लहानपणापासून झगडलाही .मात्र या पिढ्यानुपिढ्याच्या  जोखडातून बाहेर पडण्याचे स्वप्न  पळसदेवच्या माळरानावर त्याने पाहिलं. आणि वैद्यकीय क्षेत्रातील ‘एमबीबीएस’ ही पदवी प्राप्त करून आज त्याने ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं आहे. आता  निलेश डाॅक्टर झाला असून त्याच्या हातात,  गाई – म्हशीच्या दोर – दोरखंडा ऐवजी जीवनदान मागणाऱ्या रुग्णांच्या हाताची नाडी  आली आहे. 

परंपरागत काबाडकष्टाचा व्यवसाय असलेल्या शेती, माती गुराढोरांच्या जोखडातून बाहेर पडून, पळसदेव च्या निलेश नूतन शंकर काळे यांनी अत्यंत खडतर परिस्थितीशी सामना करीत एमबीबीएस ची पदवी प्राप्त केली आहे. त्याचा नुकताच पदवीदान समारंभ पार पडला.आणि जी माती एकेकाळी निलेशच्या आई-वडिलांच्या घामांच्या धारांनी भिजायची .तीच माती आज  निलेशचे वडील शंकर,आई नूतन व आजोबा भगवान दादांच्या आनंदाश्रूंनी पुन्हा एकदा भिजली आहे.

४५  वर्षांपूर्वी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये निलेशच्या आजोबाचे शेत, जमीन, घरदार सारं  काही संपादीत झाले होते. आजोबा भगवान दादा पळसदेव- काळेवाडी लगतच्या माळरानावर धरणातून वाचलेल्या जमिनीमध्ये आपले  कुटुंब  ,गाव आणि देव पाठीवर बांधून विस्थापित झाले. आजोबांनी निवारा म्हणून पानकणीसांच्या आधाराने छप्पराचा गोठा उभा केला. उदरनिर्वाहासाठी शेती विकसित करीत असताना, निलेशचे वडील शंकर यांचे शिक्षण अर्ध्यावरच थांबले.थोरले चुलते राजेंद्र यांच्याही शिक्षणाचे तेच झाले.  एक चुलते केंद्रीय पोलीस दलात आहेत .

घरी मोठी शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. मोठ्या शहरांमध्ये जाऊन शिक्षण घेण्याची परिस्थिती नाही. अशा खडतर परिस्थितीमध्ये निलेशने लहानपणीच डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिले होते . शालेय शिक्षण घेत असतानाच निलेशला शेतामध्ये पिकाला पाणी देणे, आजोबांना जनावरे राखण्यासाठी मदत करणे, गाई, म्हशीच्या धारा काढणे,शाळेतून घरी येता- येता पाठीवर दप्तराचे ओझे  आणि दुसऱ्या हातात जनावरांचे दोरखंड घेऊन आजोबांना मदत करीत घरी येणे. अशी अनेक कामे करावी लागत होती.

मात्र त्याने डॉक्टर होण्याची जिद्द आणि स्वप्न अर्ध्यावर सोडले नाही .रात्रंदिवस तो मेहनत करीत राहिला.   ते स्वप्न आज प्रत्यक्षात उतरवले असून उजनी धरणात पुनर्वसित झालेल्या पळसदेव गावाला  निलेशच्या रूपाने  एक एमबीबीएस डॉक्टर मिळाला आहे. वाड्या -वस्त्यावरील प्राथमिक शाळेत  निलेशचे प्राथमिक शिक्षण तर  श्री .पळसनाथ विद्यालयात त्याने हायस्कूलचे शिक्षण घेतले .बारावीनंतर एमबीबीएस साठी लागणाऱ्या पात्रता परीक्षा नीट साठी अभ्यासाला त्याने राजस्थान गाठले. तिथे  खडतर परिश्रम घेऊन नीट परिक्षेत  चांगले गुण मिळवून त्याला शासकीय कोट्यातून एमबीबीएस ला प्रवेश मिळाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सन २०१९ – २०२५ या बॅचला त्याने जीएस वैद्यकीय महाविद्यालय ऍन्ड केईएम हाॅस्पीटल मध्ये शिक्षण घेतले. त्याचा नुकताच पदवीदान समारंभ संपन्न झाला. निलेशच्या कुटुंबासह साऱ्या पळसदेव गावाने निलेश वर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. निलेशच्या हातात जनावरांच्या दोऱ्या- दोरखंडा ऐवजी आता रुग्णांची नाडी आली आहे. ‌ग्रामीण भागातल्या रुग्णांना वेळेवर आरोग्य सेवा मिळत नाही.ते  आजारी पडले तरी रुग्ण दवाखान्यात जाण्यासाठी चालढकल करतात .काबाड कष्ट करणाऱ्या भूमिपुत्रांची सेवा करण्याचा निलेशचा मानस आहे. आता निलेश डॉक्टर ऑफ मेडीसिन (MD) साठी नीट  परीक्षा देण्याच्या तयारीत असून , त्या प्रयत्नासाठी आता तो पुन्हा सज्ज झाला आहे.