चित्रकार, शिल्पकार असं म्हटलं तर मनात प्रथम पुरुष चित्रकार, पुरुष शिल्पकार अशी प्रतिमा आपोआप उमटते. खरं म्हणजे अगदी जुन्या काळापासून लोककला, आदिवासी कला यांचा संबंध स्त्री जीवनाशी जास्त निगडित आहे. रांगोळी, घराची चौकट सुशोभित करणं, भिंतींवर शुभचिन्ह किंवा देवादिकांची चित्र रेखाटणं, विणकाम, भरतकाम, पानं-फुलं एकत्र गुंफून त्यांची सजावट, हार, गजरे करणे ही स्त्रियांची कामं. त्यात पुरुषानं कधी फारशी ढवळाढवळ केली नाही.
[jwplayer 2p055T5d]
तरी स्वतंत्र कलाकार असा शिक्का किंवा बिरुद स्त्रीला मिळण्यासाठी बराच काळ जावा लागला.
चित्रकाराच्या पुरुषी दृष्टिकोनातून चित्राचा विषय म्हणून स्त्रियांची चित्रं बराच काळ काढली गेली. सुंदर स्त्रिया, ओलेत्या स्त्रिया, पॉल गोगाच्या जाड ढब्ब्या आदिवासी स्त्रिया, नटलेल्या स्त्रिया असे विषय प्रचलित होते, काही प्रमाणात आजही आहेत.
अमृता शेरगील, बी. प्रभा यांच्या चित्र विषयात ग्रामीण स्त्रिया प्रामुख्याने दिसतात. स्वत: स्त्री असल्यामुळे स्त्रीला अधिक चांगलं समजून घेता येतं असं आहे, की स्त्रियांचीच चित्रं काढायची या पुरुष चित्रकारांच्या भूमिकेचा प्रभाव आहे, सांगता येणार नाही. ‘मी अजून एकटी आनंदी स्त्री बघितलेली नाही’ असं बी. प्रभा म्हणते. म्हणजे स्त्रियांविषयी अनुकंपा असणारच. अमृता शेरगील अर्धी हंगेरीयन होती. परदेशातील लोकांना भारतीय ग्रामीण स्त्रीजीवनाचे अप्रूप वाटते. तसे अमृतालाही वाटले असू शकते.
‘फ्रिडा कॅलो’ मेक्सिकोमधली प्रभावी स्त्री चित्रकार. अतिशय जिद्दी, चिकाटी व्यक्तिमत्त्व, अपघातामुळे महिनोंमहिने, वर्ष, अंथरुणाला खिळून राहायला लागलं. तरी तशाही अवस्थेत चित्र काढणं सुरूच ठेवलं. तिने स्वत:ची अनेक चित्र रेखाटली. ती म्हणते ‘मी स्वत:चीच जास्त चित्र काढते. कारण खूप वेळ मी एकटीच असते. त्यामुळे मला नीट कळलेली एकमेव व्यक्ती म्हणजे मी स्वत:’ पोलिओमुळे दोन्ही पायाच्या आकारात आलेला फरक, अपघातामध्ये मोडलेला पाठीचा कणा, तिच्यापेक्षा आकाराने मोठा असलेला तिचा नवरा, अंथरुणावर झोपून राहिलेली असताना खिडकीतून दिसणारे बाहेर वाळत घातलेले कपडे हे सगळे तिच्या चित्राचे विषय. तिच्या सेल्फ पोट्रेटमध्ये कधी तिच्या आजूबाजूला अंगाखांद्यावर कावळे, पोपट असतात, कधी काटेरी मुकुट असतो. एकंदरीत ती, तिच्या भावना, तिची अवस्था, तिचा अवकाश तिच्या चित्रांमध्ये दिसतं. पुरुष चित्रकाराच्या पारंपरिक दृष्टिकोनाचा तिच्या चित्रांवर फारसा प्रभाव दिसत नाही. तिची अभिव्यक्ती इतर स्त्री चित्रकारांमध्ये उठून दिसते, प्रभावी दिसते.
पुरुषप्रधान वातावरणात स्त्रीच्या अभिव्यक्तीला कमी दर्जाचं मानलं गेलं असावं. काही स्त्री कलाकारांनी त्यांची परंपरागत सजावटीची कला – ज्यात पुरुषांनी ढवळाढवळ केली नाही – तिचाच चित्रांचे विषय म्हणून पुढे वापर केला. स्त्रियांना त्या सजावटीच्या परिघात सुरक्षित वाटलं असावं.
स्त्रियांनी काढलेल्या चित्रांना पुरुष चित्रकारांनी काढलेल्या चित्रा एवढी किंमत न येणं हाही पुरुषप्रधान समाज मनाचा परिणाम असू शकेल. २०१५ मध्ये जगात विकल्या गेलेल्या पहिल्या शंभर चित्रांमध्ये फक्त एक चित्र स्त्री चित्रकाराचे आहे.
ज्या पुरुष चित्रकारांनी स्त्रियांची चित्रं काढली, त्यांनी त्यांच्या चित्राचे विषय असलेल्या स्त्रियांचीही काही भूमिका असू शकते, त्यांनाही काही तरी सांगायचे असू शकते, असा कधी विचार केला असेल का? स्त्रियांचे चित्र काढताना पुरुष कलाकाराकडून स्त्री मॉडेलला कशी वागणूक मिळाली असेल? अनंत शक्यता या प्रश्नाच्या उत्तरात आहेत. स्त्रियांविषयी आदराची भावना बाळगणारे चित्रकार स्त्री मॉडेलला लाभले असतील तर ते त्यांचं भाग्यच म्हणायचं.
पिकासोच्या जीवनात अनेक स्त्रिया आल्या. त्याने अनेकींची पोट्रेट केली. त्याच्या मॉडर्न कलेच्या दृष्टिकोनातून, त्याच्या मनातले विचार क्युबिझमच्या माध्यमातून कॅनव्हासवर उतरवले. अनेक स्त्रिया उपभोगत असताना त्याच्या मनात त्या स्त्रियांविषयी काय भावना असतील? त्याच्या मनात त्यांच्याविषयी नीच, हीन भावना असल्यामुळे त्याच्या हातून विरूपीकरण झालेले स्त्रियांचे चेहरे उमटले असतील का? ज्या स्त्रियांना त्याने मॉडेल म्हणून बसविले होते, त्यांना स्वत:चं असं चित्र बघून कसं वाटलं असेल? त्यातल्या काही त्याच्या प्रेमिका होत्या, काही हौसेने मॉडेल म्हणून बसल्या होत्या. वाकडे तिकडे डोळे, नाक चेहऱ्याबाहेर आलेलं, कान कुठे तरी उगवलेला, वक्ष पोटातून आलेले, या सगळ्या प्रतिमांमधून चित्रकार म्हणून पिकासो पुढे गेला असेल पण त्या मॉडेलचा किमान आत्मसन्मान तरी राखला गेला असेल का? ‘वीपिंग वूमन’ अर्थात पडणारी आक्रोश करणारी स्त्री. या शीर्षकाची अनेक चित्र पिकासोने केली. स्त्रीला छळायचे, तिची भावनिक छळवणूक करायची, तिला रडवायचे आणि मग रडणाऱ्या स्त्रीचे चित्र काढायचे. सगळंच अतक्र्य.
सध्याच्या तुलनेने आधुनिक युगात स्त्री मॉडेलचे व स्त्री कलाकाराचे स्थान निश्चित उंचावले आहे. औपचारिक कलाशिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य स्त्रीला मिळू लागलं आहे. पुरुषी दृष्टिकोनातून चित्रांचे विषय निवडण्याचं प्रमाण कमी झालं आहे. पुरुषप्रधान कलाजगतात स्वत:चं स्थान निर्माण करणं, टिकवणं ही वाट निश्चित खडतर, अडचणींनी भरलेली असणार. पण एकदा या जगात स्थिरावल्यावर स्त्रियांनी भरपूर प्रसिद्धी, आदर मिळवला. त्यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळाली.
नलिनी मलानी या सद्यकालीन स्त्री चित्रकाराच्या चित्रांना भारत-पाकिस्तान फाळणीचा संदर्भ आहे. ग्रीक, भारतीय पौराणिक प्रतिमांचा वापर तिच्या कलेमध्ये दिसतो. स्वत:ची स्त्री म्हणून असलेली ओळख, तिचं स्वत्व, तिची स्थलांतरामधली भावनिक आंदोलनं समर्थपणे तिने तिच्या कलाविष्कारामध्ये मांडली.
अंजोली इला मेनन या सद्यकालीन भारतीय स्त्री चित्रकाराला पद्मश्री पुरस्काराने गौरवले गेले. बंगाली व अमेरिकी अशा मिश्र वंशाचा वारसा लाभलेल्या या स्त्री चित्रकाराने कलेच्या जगात स्वत:चे असे निश्चित स्थान निर्माण केले. वयाच्या अठराव्या वर्षीच तिने स्वत:चे एकल प्रदर्शन भरवले होते, ज्यात तिने ५० चित्र मांडली होती.
पौराणिक प्रतिमा, व्यक्तिचित्र, नग्न व्यक्तिचित्रण यामध्ये भरपूर तेजस्वी रंगांचा वापर तिने केला. तिची म्युरल्स पण वाखाणली गेली आहेत.
नीलिमा शेख, जयश्री बर्मन, रीमा बन्सल, अर्पिता सिंग या व अशा अनेक स्त्री चित्रकारांनी कलेच्या मार्गावर वाटचाल करण्याची निवड केली.
स्त्रीचे शोषण, तिचे पौराणिक संदर्भ, तिच्या मनातली भावनिक आंदोलनं, स्वप्रतिमा इथपासून तर अमूर्त चित्रकला असे अनेक विषय स्त्री चित्रकारांनी मुक्तपणे हाताळले. मुळातच स्त्रीला व्यक्त होण्याची गरजही असते व गतीही असते. समाजमान्यता, संकोचाची अनेक आवरणं, पूर्वसंस्कार, पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा या अनेक अडथळ्यातून ती अभिव्यक्ती स्वतंत्रतेकडे, मुक्ततेकडे वाटचाल करू लागली आहे.
साल्वादोर दाली या अतिवास्तववादी किंवा सररिअल चित्र काढणाऱ्या चित्रकाराने त्याच्या मनातल्या पिसाट लैंगिक प्रतिमांचं चित्रण त्याच्या चित्रात केलं आहे. बघणाऱ्याला धक्का बसेल असं. त्याला कुठलाही कार्यकारण भाव नाही. नैतिकतेच्या कुठल्याही विषयांना तो बांधिल नाही. सौंदर्यशास्त्राच्या चौकटी पलीकडच्या त्या प्रतिमा. पुरुषी मनाची ती अभिव्यक्ती. प्राणी, मानवी शरीर आणि आजूबाजूच्या निर्जीव वस्तू याचं अतिवास्तवतावादी चित्रण.
सिथु सेन या सद्यकालीन स्त्री चित्रकाराची चित्र बघून दाली आठवल्याशिवाय राहत नाही. शांती निकेतन, विश्वभारती विद्यालयातून चित्रकलेचं शिक्षण घेतलेली ही युवा चित्रकार, अतिशय निर्भीडपणे लैंगिक विषयाची मांडणी तिच्या चित्रकलेतून व इन्स्टॉलेशनमधून वाटते. अंतर्मनातील, नेणिवेतील भावना, प्रतिमा यांची मुक्त अभिव्यक्ती तिच्या चित्रातून दिसते. स्त्रीचा आक्रोश, तिच्यावरचे अत्याचार, शारीरिक, मानसिक ओरखडे हे विषय पण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रीत्या येतात. त्यासाठी मानवी आकृत्या, प्राण्यांच्या प्रतिमा, निर्जीव वस्तूंच्या प्रतिमा, लैंगिक अवयवांच्या प्रतिमा मुक्तपणे वापरल्या आहेत. तिच्या निर्भीडतेला दाद द्यावीशी वाटते. एक स्त्री म्हणून तिला ही अभिव्यक्ती करावीशी वाटली आणि समाजाने ती खिलाडूपणे स्वीकारली, यात कला जगतात झालेला बदल दिसतो.
पुरुषांची दासी, त्यांची उपभोगाची वस्तू इथपासून तर स्त्री मुक्ती भूमिका, स्त्री स्वातंत्र्याची मांडणी या टप्प्यातून आता नि:संकोचपणे केलेली स्त्रीमनाच्या लैंगिक प्रतिमांची अभिव्यक्ती इथपर्यंत चित्रकारीतेच्या महिला जगतात बदल झालेले आहेत.
पेंटिंग शिकण्याच्या वर्गामध्ये महिलांचा सहभाग खूप दिसतो. पण अजूनही प्रसिद्धी मिळवलेल्या व भरपूर किमतीत ज्यांची चित्र विकली जातात, अशा पुरुषांच्या मानानी स्त्री चित्रकारांची संख्या मात्र खूप कमी आहे.
डॉ. माधवी मेहेंदळे madhavimehendale@gmail.com
[jwplayer IpMAjeHI]