पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनच्या (महामेट्रो) भुयारी मेट्रो स्थानकांमध्ये इंटरनेट सेवेत अडथळा येत असल्याने ऑनलाइन तिकीट काढताना प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्वारगेट, मंडई, कसबा पेठ, सिव्हील कोर्ट आणि शिवाजीनगर या पाच ठिकाणी भुयारी मेट्रो स्थानके असून, या ठिकाणी तिकिटे काढण्यात विलंब होत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. महामेट्रोने इंटरनेट सुविधेची तपासणी करण्याच्या सूचना संबंधित कंपन्यांना दिल्या आहेत.

वनाज ते रामवाडी आणि शिवाजीनगर ते पिंपरी-चिंचवड या दोन्ही मार्गिकांवर स्वारगेट, मंडई, कसबा पेठ, सिव्हील कोर्ट आणि शिवाजीनगर या पाच ठिकाणी भुयारी मेट्रो स्थानके आहेत. स्वारगेट, मंडई स्थानकांवर सकाळी ८ ते १० आणि संध्याकाळी ५ ते ७ या कालावधीत प्रवाशांची गर्दी असते. या ठिकाणी ऑनलाइन तिकीट काढण्यासाठी १० ते १५ मिनिटांचा कालावधी लागत आहे. तसेच वाय-फाय सुविधेचा अवलंब करता येत नाही. तिकीट खिडकीवर रांगा लागत आहेत.

दरम्यान, महामेट्रोने भूयारी मार्गातील प्रवासादरम्यान आणि स्थानकांवर ‘इन बिल्डींग सोल्यूशन’ (आयबीएस) या पायाभूत सुविधेचा अवलंब करण्यात आला आहे. या सुविधेचा प्रत्येक ठिकाणी अवलंब करणे अनिवार्य असल्याने एअरटेल आणि वोडाफोन या प्रदात्यांची सेवा बसविण्यात आली आहे. मात्र, अनेकदा गर्दीच्या काळात इंटरनेट सेवेवर परिणाम होत असल्याने ही सेवा अपुरी पडते किंवा कोलमडून पडते, याची तांत्रिक तपासणी करण्यात आली आहे. तसेच जीओ आयबीएस या नवीन सेवेचा अवलंब करण्यात येणार असल्याचेही असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.

‘ऑनलाइन तिकीट काढताना त्रास होत आहे. रोखीने पैसे देऊन तिकीट घेताना सुट्ट्या पैशांमुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे सकाळी नियोजित वेळेत कार्यालयात पोहोचण्यास विलंब होतो,’ असे दिनेश नायर या प्रवाशाने सांगितले. ‘ऑनलाइन तिकीट सुविधेत येणाऱ्या अडथळ्यांमुळे अडचण होते. त्यामुळे प्रवासाला विलंंब होतो. महामेट्रोने इंटरनेट सुविधेतील समस्या दूर करावी,’ असे प्रवासी पल्लवी आहेर म्हणाल्या.

महामेट्रोच्या भुयारी स्थानकांमधील इंटरनेट सुविधा सुधारण्यासाठी संबंधित कंपन्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. नवीन आयबीएस सेवा वाढविण्यात येत आहे. प्रत्येक स्थानकावर बुस्टर बसविण्यात आले आहेत. पावसाळी वातावरण, गर्दी यामुळे गणेशोत्सव काळात अडचणी आल्या होत्या. चंद्रशेखर तांबवेकर,अतिरिक्त महासंचालक, महामेट्रो