लक्ष्मण जगताप, भाजप
निवडणूक तयारी कशी सुरू आहे?
भाजपकडे ४७० इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. सर्वेक्षण करण्यात आले आहे, त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होईल. त्यानुसार, सर्वानुमते उमेदवार ठरवण्यात येतील. ‘वॉर रूम’ सज्ज आहे. प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र जाहीरनामा तयार करण्यात येणार आहे.
कोणते मुद्दे असतील?
महापालिकेतील भ्रष्ट कारभार हाच निवडणुकीचा मुख्य मुद्दा राहणार आहे. राष्ट्रवादीकडून करण्यात येणारे स्थानिक कार्यकर्त्यांनी काम केले म्हणून विकास होऊ शकला. सत्ता असून वर्षांनुवर्षे त्यांना अनधिकृत बांधकामे, शास्तीकराचा प्रश्न सोडवता आला नाही. संरक्षण खात्याशी संबंधित अनेक गावांमधील प्रश्न मार्गी लावता आले नाहीत. यशवंतराव चव्हाण, अण्णासाहेब मगर यांच्या प्रयत्नाने शहरहिताचे महत्त्वाचे निर्णय झाले. उत्पन्नाचे नवनवे स्तोत्र त्यांनी उपलब्ध निर्माण करून दिले. तसे काम यांना करता आले नाही. िपपरी-चिंचवडने अजित पवारांना नाव दिले. मात्र, त्यांनी शहराला काय दिले?
शिवसेना-भाजप युतीविषयी..
युतीची बोलणी सुरू आहेत. शिवसेनेने आडमुठी भूमिका ठेवल्यास अवघड आहे. थेरगाव प्रभागाच्या आठही जागांसह ६४ जागांचा त्यांचा आग्रह अवास्तव वाटतो. रिपाइं, रासप आदी मित्र पक्षही आहेत. प्रत्येकाने कुवतीप्रमाणे जागा मागितल्या पाहिजेत. त्यांच्या मागणीप्रमाणे जागा दिल्यास भाजपला काहीच राहणार नाही. सर्वेक्षणातील अहवालानुसार उमेदवार ठरवले जाणार आहेत.
वाढत्या भाजप प्रवेशाबद्दल?
भाजपमध्ये येणारे स्वत:च्या मनाने येत आहेत. त्यांना प्रलोभन किंवा दमदाटी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सत्तेच्या माध्यमातून विकासाची कामे होतील, याची खात्री वाटल्याने व भाजपविषयी विश्वासार्हता वाटत असल्याने भाजपकडे कार्यकर्त्यांचा ओढा आहे. गाजराची शेती भाजपकडे नसून ती राष्ट्रवादीकडेच आहे. गेल्या अनेक वर्षांत अनेकांनी त्याचा अनुभव घेतला आहे.