पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर २०० कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप करणारं पत्र व्हायरल झालं. यानंतर सध्या मुंबईचे पोलीस महानिरीक्षक म्हणून काम करत असलेल्या कृष्ण प्रकाश यांनी यावर प्रतिक्रिया दिलीय. यात त्यांनी संबंधित पत्र खोटं असल्याचं म्हटलंय. तसेच आपल्या विरोधात काही व्यक्तींनी षडयंत्र केल्याचा आरोपही केलाय. दुसरीकडे आरोप करण्यात आलेल्या पत्रावर ज्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे त्या अधिकाऱ्याने देखील आपलं नाव वापरून खोटी सही करून पोलीस विभागाची बदनामी केल्याची तक्रार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडे केलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या आरोपांवर बोलताना कृष्ण प्रकाश म्हणाले, “माझ्यावरील आरोप हे काही व्यक्तींनी केलेलं षडयंत्र आहे. मी चुकीचं काहीही केलेलं नाही. हे पत्र खोटं आहे. पत्र खोटं असल्याचं एपीआय अशोक डोंगरे यांनी देखील सांगितलं आहे. तशी तक्रार केली आहे.”

व्हायरल पत्र खोटं असल्याचा पोलीस अधिकाऱ्याचा खुलासा

दुसरीकडे व्हायरल पत्राद्वारे ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या नावाने कृष्ण प्रकाश यांच्यावर २०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप करण्यात आले त्या अधिकाऱ्याने हे पत्र खोटं असल्याचं, आपल्या नावाचा गैरवापर करून खोटी सही केल्याचा आरोप केलाय. तसेच याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केलीय.

व्हायरल पत्राबाबत तक्रारीत काय म्हटलंय?

सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटलं आहे, “आज (६ मे) सकाळी ८ वाजता पिंपरी पोलीस ठाणे येथे बंदोबस्तासाठी असताना मला व्हॉट्सअॅपवर एक चार पानी पत्र वाचण्यास मिळालं. या पत्रात पिंपरी चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा ‘रीडर’ म्हणून काम करत असताना काही पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा उल्लेख करून खोटे आरोप करण्यात आले.”

हेही वाचा : लेटर बॉम्ब: IPS कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटींची वसुली? पोलीस दलात खळबळ उडवणारे पत्र व्हायरल

“बदनामी करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी”

“या पत्रात माझे नाव वापरून खोटी सही करून खोटे आरोप करण्यात आले आहेत. यातून माझी व तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची प्रतिमा मलिन करण्याचा आणि बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. यामुळे पोलीस दलाची प्रतिमा खराब झाली आहे. त्यामुळे अशाप्रकारे कुटील डाव करून बदनामी करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी,” अशी विनंती पोलीस अधिकारी डोंगरे यांनी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ips krishna prakash first reaction on viral letter alleging 200 crore corruption in pune kjp pbs
First published on: 06-05-2022 at 20:42 IST