लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: गणेशमूर्तीच्या विक्रीसाठी दुकाने उभारण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा व्यवसाय परवाना घेणे सक्तीचे आहे. व्यवसाय परवाना असल्याशिवाय मूर्ती विक्री केल्यास कारवाईचा इशारा आकाशचिन्ह व परवाना विभागाने दिला आहे.

शहरात गणेशमूर्ती विक्रीची दुकाने उभारली जातात. मूर्ती विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल होते. त्यासाठी महापालिकेचा व्यवसाय परवाना असणे बंधनकारक असून, ४९९ रुपये शुल्क भरावे लागते. अर्जासोबत जागेचा नकाशा, शंभर रुपयांच्या स्टँप पेपरवर प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, पॅनकार्डची प्रत जोडावी लागते. परवाना मिळाल्यानंतर १९ सप्टेंबरपर्यंत मूर्तीची विक्री करता येणार आहे. व्यवसाय परवाना असल्यास संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडून स्टॉलसाठी मंडप टाकण्यास परवानगी दिली जाते. त्यासाठी वाहतूक पोलिसांचाही ना-हरकत दाखला जोडणे आवश्यक असते.

हेही वाचा… डेंग्यूचे लवकरच स्वस्तात निदान! किफायतशीर अन् प्रभावी चाचणीवर संशोधन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आतापर्यंत महापालिकेकडे १९३ अर्ज आले आहेत. त्यावर तत्काळ कार्यवाही करून परवाना दिला जात आहे. व्यवसाय परवाना असल्याशिवाय मूर्ती विक्री केल्यास कारवाई केली जाणार असल्याचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी सांगितले.