पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीसह नागरी समस्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (गुरुवारी) मुंबईत बैठक घेणार आहेत. या बैठकीला स्थानिक आमदार शंकर मांडेकर, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह स्थानिक रहिवासी संघटना आणि आयटीयन्सच्या संघटनांना निमंत्रणच नाही. पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या दोन आमदारांना मात्र निमंत्रण आहे.

मुख्यमंत्री गुरुवारी दुपारी पावणेदोन वाजता आयटी पार्कबाबत मंत्रालयात बैठक घेणार आहेत. या बैठकीची सूचना नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी नीलेशकुमार चव्हाण यांनी प्रसिद्ध केली आहे. या बैठकीचे निमंत्रण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, नगरविकास विभागाचे राज्यमंत्री, आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, उद्योग सचिव, पुणे महापालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अशा १३ जणांना पाठविण्यात आले आहे.

या बैठकीला स्थानिक आमदार शंकर मांडेकर, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह आय़टी पार्क परिसरातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच यांना निमंत्रित करण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे आयटी पार्कमधील नागरी समस्यांबाबत वारंवार आवाज उठविणाऱ्या स्थानिक रहिवासी संघटना आणि आयटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनाही या बैठकीसाठी बोलाविण्यात आलेले नाही.

याबाबत आमदार मांडेकर म्हणाले, ‘आयटी पार्कचा परिसर माझ्या मतदारसंघात येतो. येथील नागरी समस्या सोडविण्यासाठी मी सातत्याने पावले उचलत आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचे निमंत्रण मला नाही. भाजपच्या दोन आमदारांना मात्र बोलावले आहे. यामुळे या बैठकीत नेमका काय निर्णय होणार, याकडे संशयाने पाहिले जात आहे. या प्रकरणी राजकारण केले जातून असून सरकारने जनहिताकडे अधिक लक्ष द्यावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘हिंजवडी-माण भागाचे प्रतिनिधित्व करणारा कोणताही लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक संस्था वा स्थानिक नागरिकांना मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला आमंत्रित करण्यात आलेले नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी, हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन आणि हिंजवडी माण एम्प्लॉइज अँड रेसिडंट्स ट्रस्ट किंवा फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज अशांच्या अनुपस्थितीत हिंजवडी माण संदर्भातील विषयांवर कशी काय चर्चा आयोजित करण्यात येत आहे,’ असा प्रश्न हिंजवडी माण एम्प्लॉइज अँड रेसिडंट्स ट्रस्टचे ज्ञानेंद्र हुलसुरे यांनी उपस्थित केला.