पिंपरी : माझ्या बदलीबाबत सातत्याने चर्चा केली जाते. कोण म्हणते माझी पत्नी दिल्लीत सनदी अधिकारी आहे. त्यामुळे मी बदलीसाठी इच्छुक आहे. असे काही नाही. माझी पत्नी सनदी अधिकारी नाही. मी बदलीसाठी इच्छुक नाही. तीन वर्षांचा कालावधी महापालिकेत पूर्ण करण्यास मिळाल्यास आनंद होईल, असे सांगत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी बदलीच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने साताऱ्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची १६ ऑगस्ट २०२२ रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केली. लोकप्रतिनिधी नसताना आयुक्तच प्रशासक झाले. मात्र, आयुक्त सिंह यांची कार्यपद्धती विरोधकांना रुचली नाही. विरोधक सातत्याने आयुक्तांवर टीका करत आहेत. आयुक्त भाजपा आमदारांच्या कलाने काम करत असल्याचा आरोप आहे. आयुक्तांची नियुक्ती झाल्याच्या तीन महिन्यांतच खासदार श्रीरंग बारणे यांनीही मुख्यमंत्र्यांकडे आयुक्तांची तक्रार केली होती. त्यावेळीही आयुक्तांच्या बदलीची चर्चा झाली होती.
हेही वाचा – पुणे : कोंढव्यात घरखर्चास पैसे न दिल्याने पत्नीकडून पतीवर चाकूने वार
हेही वाचा – पुणे : बेकायदा सावकाराविरुद्ध गुन्हा; महिलेला धमकावून अडीच लाख रुपये उकळले
मागील काही दिवसांपासून पुन्हा आयुक्तांची बदली होणार, आयुक्त महापालिकेत कामकाज करण्यासाठी इच्छुक नसल्याची चर्चा सुरू झाली होती. याबाबत विचारले असता आयुक्त सिंह म्हणाले, माझ्या बदलीबाबत सातत्याने वेगवेगळी चर्चा केली जाते. कोण म्हणते माझी पत्नी दिल्लीत सनदी अधिकारी आहे. मी महापालिकेत काम करण्यास इच्छुक नसून बदलीसाठी प्रयत्न करत आहे. पण, असे काही नाही. माझी पत्नी सनदी अधिकारी नाही. मी बदलीसाठी इच्छुक नाही. माझी बहिण सांगलीला आयपीएस पोलीस अधिकारी आहे. बदली करण्याचा शासनाला अधिकार आहे. शासन जोपर्यंत ठेवेन तोपर्यंत काम करणार आहे. तीन वर्षांचा कालावधी महापालिकेत पूर्ण करण्यास मिळाल्यास आनंद होईल.