पुणे : पुण्यातील ‘जैन बोर्डिंग प्रकरण’ हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अंगलट येण्याची शक्यता लक्षात येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घातले. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेऊन चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश देताच भाजपने या प्रकरणात शनिवारी सारवासारव केली. तसेच जैन समाजाबरोबर असल्याची भूमिकाही जाहीर केली.
पुण्यातील ‘जैन बोर्डिंग’च्या जागेचा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या जागेच्या व्यवहारामध्ये मोहोळ यांचा सहभाग असल्याचा आरोप शिवसेना (शिंदे) पक्षाचे महानगरप्रमुख, माजी आमदार रवींद्र धंगेकर करत आहेत. परंतु संबंधित बांधकाम व्यावसायिक हा भागीदार नसल्याचा दावा मोहोळ यांनी केला आहे. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जैन समाजाचा रोष पत्करावा लागण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घातले.
मुख्यमंत्र्यांनी आदेश देताच शनिवारी दिवसभर भाजपचे स्थानिक नेते आणि मोहोळ सक्रिय झाले. ‘भाजप जैन समाजाच्या पाठीशी आहे. या प्रकरणात समाजाच्या मागण्या आणि भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवून त्या सोडविण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्याची मागणी जैन मुनी आणि जैन समाजाकडून केली जात आहे. त्यासाठी आंदोलन करून मोर्चा काढण्याचा इशाराही जैन बांधवांनी दिला. या मोर्चात सहभागी होण्याची भाजपची तयारी आहे,’ अशी भूमिका भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली.
मोहोळांचा जैन मुनींशी संवाद
भाजपच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंग येथे जाऊन जैन मुनींशी संवाद साधला. ‘भाजप सदैव जैन समाजाच्या पाठिशी असून, जैन बांधवांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे’ असे आश्वासन मोहोळ यांनी दिले.
या प्रकरणात माझ्यावर झालेले आरोप खोटे आहेत. जैन समाजाला न्याय मिळवून दिला जाईल. पुढील काही दिवसांत हा प्रश्न संपलेला असेल. हा विषय मिटविण्यासाठी जैन मुनींची भेट घेतली. – मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री
‘जैन बोर्डिंग’ प्रकरण काय?
- पुण्यात शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनीमध्ये ‘शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंग ट्रस्ट’ या धर्मादाय संस्थेची (स्थापना १९८५) ‘जैन बोर्डिंग’ ही वसतिगृहाची जागा आहे. ज्या विकसकाने ही जागा विकासासाठी घेतली, तो बांधकाम व्यावसायिक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा व्यावसायिक भागीदार आहे. काही विश्वस्तांनी जमीन विकताना आवश्यक परवानगी आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता व्यवहार केल्याचा आरोप आहे. या व्यवहारामुळे जैन समाजात रोष आहे. या प्रकरणात आता धर्मादाय आयुक्तांनी ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचा आदेश दिला आहे. हा व्यवहार रद्द करावा, अशी ‘बोर्डिंग बचाव कृती समिती’ची मागणी आहे.
- ट्रस्टच्या जागेवर मंदिर आहे का, त्याचा तपशील काय आहे, मंदिराचे व्यवस्थापन कोण करत आहे, जागेचे क्षेत्रफळ किती आहे, या सर्व बाबींचा अहवाल मागविण्यात आला आहे. २७ ऑक्टोबरपर्यंत हा अहवाल द्यायचा आहे. हा व्यवहार रद्द करावा, अशी ‘बोर्डिंग बचाव कृती समिती’ची मागणी आहे.
