‘जलदिंडी प्रतिष्ठान’ तर्फे दरवर्षी जलदिंडीचे आयोजन करण्यात येणाऱ्या जलदिंडीला शुक्रवारपासून (२३ ऑक्टोबर) सुरूवात होणार आहे. आळंदी ते पंढरपूर असा जलदिंडीचा मार्ग असेल.
नदीच्या मार्गाने २३ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या कालावधीत प्रवास करत जलदिंडी पंढरपूरला पोहोचेल. या प्रवासात काठावरील गावांमध्ये नद्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यात येणार आहे. या दरम्यान तुळापुर-संगमेश्वर, वाळकी संगम, कवठा, कुंभारगाव, गंगावळण, निरा-नृसिंहपूर, इसबावी या सात ठिकाणी जलदिंडीचा मुक्काम असणार आहे. आळंदीपासून सुरू होणाऱ्या या जलदिंडीची सांगता पंढरपूरमधील विठ्ठल मंदिराजवळ होणार आहे. जलदिंडीच्या माध्यामातून जनतेच्या मनात नद्यांच्या प्रति एक सकारात्मक जाणीव निर्माण करणे हा या जलदिंडीचा उद्देश आहे. सकारात्मक स्वास्थ्य, पर्यावरण आणि आध्यात्म यांची सांगड घालणारी अशी ही जलदिंडी असते, असे प्रतिष्ठानतर्फे प्रसिद्धिस देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.