“भाजीपाला ते औषधींपर्यंत केंद्र सरकारने महागाई करून ठेवली आहे. या महागाईमधून देशातील जनतेला बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने विशेष प्रयत्न केले पाहिजे. मात्र हे सरकार कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही. म्हणून महागाईच्या विरोधात आम्ही आंदोलन करुन या सरकारला जागे करण्यासाठी अखेरपर्यंत आंदोलन करीत राहणार आहोत.” असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, सीएनजी, घरगुती गॅसच्या दरात केलेली वाढ आणि घरगुती वापराच्या वस्तूंवर लादलेला जीएसटी इत्यादींच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात आज (सोमवार) पुण्यात भुसारी कॉलनी येथे जनआक्रोश आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी सुप्रिया सुळेंनी वरील विधान केलं आहे.

गुलाबराव पाटलांना मंत्रीपदावरून परत टपरीवर चुना लावायला बसावं लागणार – रुपाली पाटील

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पेट्रोलवरील ५ रुपये कमी करून काही होणार नाही. केंद्र सरकार यंत्रणा आणि पैशाच्या जोरावर चुकीच काम करीत आहे. ही दुर्दैवाची गोष्ट असून देशासाठी धोक्यांची घंटा आहे. केवळ राजकीय व्यक्तीनाच यांनी नोटिसा पाठवल्या नाहीत, तर तिथेच पत्रकारांना देखील नोटिसा पाठवल्या आहेत. त्यामुळे देशाच ऐक्य आणि संविधान धोक्यात आलं आहे. हे केंद्र सरकारच्या कृतीतून दिसत आहे.”

भाजपाने निर्मला सीतारामन यांच्याकडे बारामती मतदारसंघाची जबाबादारी सोपावली आहे, यावर प्रतिक्रिया विचारण्यात आल्यावर सुप्रिया सुळेंनी म्हटले की, “मी निर्मला सीतारामन यांचे मनापासून स्वागत करते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा काय म्हणता, एक पार्टी एक देश पण आमचं त्याच्याबरोबर विरोधात मत आहे. आमचा पक्ष बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार चालणार पक्ष आहे. त्यामुळे एक देश आणि अनेक पक्ष राहिलेच पाहिजे. निर्मलाताई जेव्हा येतील, तेव्हा मी स्वतः स्वागत करेल त्यांनी त्यांचा पक्ष का वाढवू नये. आम्ही आमचा पक्ष वाढवावा, त्यामध्ये गैर काय आहे. मला या मतदार संघावर प्रचंड प्रेम आहे. तसेच बारामती तर प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. तिथे जे पाहुणे येतात ते सर्टिफिकिट देत आहेत, त्याबद्दल मला मनापासून आनंद आहे.” असंही यावेळी सुळे यांनी बोलून दाखवलं.

रोहित पवार संदर्भात काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? –

रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीचे प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश ईडीने दिल्याची माहिती समोर आली आहे. यावर बोलताना सुप्रिया सुळेंनी सांगितले की, “त्याची अजून चौकशी सुरू नाही. चौकशी करणार अशी बातमी मी पाहिली आहे. त्यावर रोहित सोबत बोलणे झालं आहे. त्याला काही नोटीस आलेली नाही. आमच्या कुटुंबातील कोणालाही नोटीस आली तर आमची सहकार्याची भूमिका राहिली आहे. माझा न्याय व्यवस्थेवर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला काही लपवयाची गरज नाही. त्यामुळे आम्हा कोणालाही नोटीस आलीच तर कोणाला काही अडचण येणार नाही. असे काही प्रसंग आले तर आम्ही त्याला नक्कीच उत्तर देऊ.”

पूल पाडण्याअगोदर पर्यायी रस्ता उपलब्ध करावा –

याशिवाय, चांदणी चौकातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर जिल्हाध्यक्ष यांच्याशी माझ बोलणे झाले आहे. चांदणी चौकामधील पूल पाडावा लागेल, असे त्यांनी सांगितले. मात्र पूल पाडण्या अगोदर पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा.” असं सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Janaakrosh movement of ncp led by supriya sule against the central government in pune msr 87 svk
First published on: 29-08-2022 at 11:31 IST