पुणे : ‘राज्यातील चंदगड आणि कुडाळ येथे काजू प्रक्रिया उद्योग उभारण्याच्या संदर्भात व्यवहार्यता तपासण्यात यावी. तसेच, पाचशे टन क्षमतेचे गोदाम उभारण्यासंदर्भात नियोजन करावे,’ अशी सूचना राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी येथे दिली. महाराष्ट्र राज्य काजू मंडळाची आढावा बैठक मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी त्यांनी ही सूचना केली. महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनचे कार्यकारी संचालक श्रीधर डुबे पाटील, महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, पणन विभागाचे सहसचिव विजय लहाने तसेच काजू मंडळाचे सदस्य या बैठकीला उपस्थित होते.
रावल म्हणाले, ‘काजू उत्पादनाच्या वाढीसाठी जगातील चांगल्या काजू वाणाचा अभ्यास करून राज्यात त्याची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. काजू पीक आल्यानंतर त्यावर प्रक्रिया आणि साठवणूक करण्याच्या दृष्टीने महिला बचत गटाची तसेच महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सहभाग वाढविणे आवश्यक आहे. काजूमधील ओलावा कमी करण्याच्या प्रक्रियेमधे गोदामे उपलब्ध करून देण्यात यावी. काजू उद्योगांना अद्ययावत करण्यासाठी व्हिएतनाम, कंबोडिया यांसारख्या देशातील प्रगत तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा आणि शंभर टन प्रती दिन उत्पादन क्षमतेचे प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी उपाययोजना कराव्यात.’