स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही देश अंधश्रद्धेने ग्रासलेला- डॉ. जयंत नारळीकर

माणूस हा बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखला जातो

पं. राजन-साजन मिश्रा, रमा बिजापूरकर, डॉ. जयंत नारळीकर, राजीव सातव आणि मनोज जोशी यांना एमयटी विश्वशांती विद्यापीठाच्या भारत अस्मिता पुरस्कारांनी गौरविण्यात आले. या वेळी डॉ. विश्वनाथ कराड, प्रा. राहुल कराड, डॉ. विजय भटकर आदी उपस्थित होते.

माणूस हा बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखला जातो, पण असे असले तरी हाच माणूस अंधश्रद्धेच्या आहारी जातो. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली, तरी वैज्ञानिक दृष्टिकोन अद्याप पूर्ण रुजलेला नाही, तो रुजविण्यासाठी येथून पुढेही मला काम करायचे आहे, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी शनिवारी व्यक्त केले.

एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे विविध क्षेत्रांमध्ये बहुमोल कामगिरी केलेल्यांना दिले जाणारे भारत अस्मिता पुरस्कार शनिवारी प्रदान करण्यात आले. या वेळी  डॉ. जयंत नारळीकर यांना भारत अस्मिता विज्ञान तंत्रज्ञान श्रेष्ठ, रमा बिजापूरकर यांना भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार तर काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांना भारत अस्मिता जन प्रतिनिधी श्रेष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बनारस घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. राजन-साजन मिश्रा आणि अभिनेते मनोज जोशी यांना भारत अस्मिता जन-जागरण श्रेष्ठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड, शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर आणि नानिक रुपानी यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. नारळीकर म्हणाले, शेक्सपिअरने म्हटल्याप्रमाणे जगात काही माणसे थोर म्हणून जन्माला येतात, काही आपल्या कर्तृत्वाने थोर होतात तर काहींवर थोरपण लादले जाते. मी त्या तिसऱ्या वर्गात मोडतो असे मला वाटते. माझे काम सामान्य आहे. विज्ञानाच्या क्षेत्रातील काम हे कधीही न संपणारे काम आहे. पं. राजन मिश्रा म्हणाले, भारतीय शिक्षण पद्धतीमधून स्पर्धा हटविली तर अनेक गुणी आणि बुद्धिमान विद्यार्थी या देशाला मिळतील. आमच्या कुटुंबात ३०० वर्षांपेक्षा जास्त काळ शास्त्रीय संगीत आहे, मात्र आम्ही गायनाकडे येऊ अशी कल्पना केली नव्हती. मात्र योग्य गुरू लाभले आणि संगीत क्षेत्रातील वाटचाल सुकर झाली. मनोज जोशी म्हणाले, चित्रपट सृष्टीतील झगमगत्या पुरस्कारांसाठी मी काम करत नसल्याने ते न मिळाल्याची खंत वाटत नाही. वडील संस्कृत शिक्षक असल्याने माझ्यावर उत्तम संस्कार झाले. त्यामुळेच १२० चित्रपट आणि २० नाटकांमध्ये काम केले, तरी ग्लॅमरचा स्पर्श मला झालेला नाही आणि ‘चाणक्य’ या नाटकाचा यज्ञ सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि ‘स्वामी विवेकानंद’ यांच्यावरील नाटकांचे काम सुरू आहे. रमा बिजापूरकर म्हणाल्या, विद्यार्थ्यांने आपल्या शिक्षकाच्या पुढे जाणे हाच शिक्षकाला मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार असतो. काँग्रेसचे खासदार राजीव सातव म्हणाले, कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे विद्यार्थ्यांनी कायम लक्षात ठेवायला हवे. २०१४ ला निवडणुकीला उभा राहिलो, तेव्हा मोदी लाट असल्याने मी निवडणूक लढू नये असे अनेकांकडून सुचविण्यात आले. हेच नुकत्याच झालेल्या गुजरात निवडणुकीच्या वेळी अनुभवायला मिळाले. मात्र कोणतीही गोष्ट अशक्य नाही या विचाराने लढलो आणि यश मिळाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Jayant narlikar comment on economic development in india