अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी एकास विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी १५ वर्ष सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

विलास बापुराव साळुंखे (वय ५८) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. २०१९ मध्ये साळुंखे याने जेजुरीजवळील एका गावातील १६ वर्षीय मुलीवर अत्याचार केले होते. या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी त्याच्या विरोधात बलात्कार तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी या प्रकरणाचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

विशेष सरकारी वकील ॲड. अरुंधती ब्रम्हे यांनी या खटल्यात बाजू मांडली. साक्ष तसेच पुरावे ग्राह्य धरुन न्यायालयाने साळुंखेला १५ वर्ष सक्तमजुरी आणि २५ दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी एक वर्ष शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.