जेजुरी : जेजुरी नगर परिषदेची मतदार यादी प्रसिद्ध झाली असून, त्यामध्ये दुबार, बोगस मतदारांबरोबरच अनेक कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या प्रभागांत असल्याच्या तकारी आल्या आहेत. या यादीत १५,८०० मतदार असून, ३३०० जणांनी हरकती नोंदविल्या आहेत. त्यामुळे घरोघरी जावून प्रत्यक्ष मतदारांच्या माहितीची पडताळणी करण्याचा निर्णय नगर परिषद प्रशासनाने घेतला आहे.
या नगर परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. १० प्रभागांमधून २० नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी घरोघर जाऊन संपर्क सुरू केला आहे. मात्र, प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीमध्ये दुबार, बोगस नावांबरोबरच अनेक कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या प्रभागांत असल्याचे दिसून आले आहे. प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये १५,८०० मतदार आहेत. ३३०० जणांनी हरकतीचे अर्ज नगरपरिषद कार्यालयाकडे दिले आहेत.
‘मतदार यादी सदोष आहे. अन्य गावांतील रहिवाशांची नावे मतदार यादीत आहेत. तसेच काही जण दहा-बारा वर्षांपूर्वी जेजुरी सोडून गेले आहेत. मात्र, त्यांची नावे मतदार यादीत आहेत. याची सखोल चौकशी व्हावी. मतदार यादीतील बोगस नावे तातडीने रद्द करावीत, अशी मागणी भाजपच्या नेत्या अलका शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
नगर परिषदेकडे ३३०० मतदारांचे तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अन्य प्रभागांत नावे असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नगर परिषदेचे कर्मचारी अर्जदारांच्या घरी जाऊन संबंधित ठिकाणी अर्जदार राहतात का, याची तपासणी करणार आहेत. त्यामध्ये स्थलांतरित, मृत मतदारांची माहिती घेतली जात आहे. – चारुदत्त इंगोले, मुख्याधिकारी, जेजुरी नगरपरिषद
मतदार यादी सदोष आहे. अन्य गावांतील रहिवाशांची नावे मतदार यादीत आहेत. तसेच काही जण दहा-बारा वर्षांपूर्वी जेजुरी सोडून गेले आहेत. मात्र, त्यांची नावे मतदार यादीत आहेत. मतदार यादीतील बोगस नावे तातडीने रद्द करावीत. – अलका शिंदे, भाजप नेत्या, जेजुरी
