पिंपरी चिंचवड : जेष्ठानुबंध अॅपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी उदघाटन झाले होते. हे अॅप जेष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. जेष्ठानुबंध अॅप वर स्वतः पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे यांनी फोन करून पोलीस किती तत्पर आहेत, याविषयी माहिती जाणून घेतली.
जेष्ठानुबंध अॅपमुळे ६० वर्षावरील नागरिकांना सोबती मिळाला आहे. दवाखाना, औषधे, किराणा माल, मोकळ्या वेळेत गप्पा, तातडीची सेवा, सरकारी रुग्णालये, खासगी रुग्णालयाचे नंबर अॅपमध्ये असल्याने तात्काळ सेवा भेटते. आज पोलीस आयुक्त विनायक चौबे यांनी याबाबत खात्री केली. पोलिसांकडून जेष्ठ नागरिकांना तातडीची सेवा मिळते का, हे पाहिलं. पोलीस आयुक्तांनी फोन लावून ‘मला औषध हवं’ असं सांगितलं. अॅपच्या नियंत्रण कक्षावरून पोलीस आयुक्तांना सर्व माहिती विचारून घेतली.
हे सर्व पाहून पोलीस आयुक्तांनी समाधान व्यक्त केले आहे. पोलीस आयुक्तालयात याआधी कधीही अशी अॅपद्वारे जेष्ठ नागरिकांची सेवा करण्यात आली नाही. त्यामुळं या अॅपचे सध्या कौतुक होत आहे. जेष्ठानुबंधसाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. त्याला विशेष मनुष्यबळ दिलेलं आहे. जेष्ठांच्या समस्या याद्वारे सोडवल्या जात असून आत्तापर्यंत २३ हजारांपेक्षा अधिक जेष्ठ नागरिकांनी अॅपमध्ये नोंद केलेली आहे. त्यामुळं त्यांच्यापर्यंत पोहचणे आणि तात्काळ सेवा पोहचवणे पोलिसांना अत्यंत सोपं होतं आहे. जेष्ठानुबंध हे अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.