पुणे : यंदा गावरान ज्वारीची लागवड चांगली झाली आहे. यंदा ज्वारीच्या दरात प्रति किलोमागे १५ रुपयांनी घट झाली आहे. गेल्या वर्षी काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस झाल्याने ज्वारीचे नुकसान झाल्याने ज्वारीचे दर तेजीत होते.

ज्वारीला मागणी चांगली असल्याने दर टिकून राहणार आहेत. ज्वारीचा हंगाम यंदा पंधरा दिवस उशिरा सुरू झाला. फेब्रुवारी महिन्यात नव्या ज्वारीचा हंगाम सुरू झाला. यंदा ज्वारी काढणीच्या वेळी अनुकूल वातावरण होते. गेल्या हंगामात काढणीच्या वेळी पाऊस झाल्याने ज्वारीचे नुकसान झाले होते. मार्केट यार्डातील भुसार बाजारात दररोज १० ते १५ ट्रक ज्वारीची आवक होत आहे. घाऊक बाजारात प्रतवारीनुसार एक किलो ज्वारीला ३० ते ५८ रुपये दर मिळाले आहेत. गेल्या वर्षी एक किलो ज्वारीला ३० ते ७२ रुपये दर मिळाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ज्वारीचे दर स्वस्त असल्याची माहिती भुसार बाजारातील ज्वारी व्यापारी शाम लोढा यांनी दिली.

भुसार बाजारात सोलापूर, बार्शी, जामखेड, बीड जिल्ह्यातील कडा, आष्टी परिसरातून ज्वारीची आवक होत आहे. खानदेशातून काही प्रमाणात ज्वारीची आवक होत आहे. पुण्यातील बाजारात सोलापूर, जामखेड, कडा, आष्टी भागातील ज्वारीला जास्त मागणी असते. पिवळी गावरान, पांढरी ज्यूट, दुरी अशा प्रकारची ज्वारी बाजारात उपलब्ध आहे. दुरी ज्वारीची आवक कर्नाटकातून होते. या ज्वारीची प्रतवारी गावरान ज्वारीच्या तुलनेत कमी असते. दुरी ज्वारीची भाकरी कडक होते. गावरान ज्वारीची भाकरी मऊ होते. त्यामुळे गावरान ज्वारीला जास्त मागणी असते. गेल्या वर्षी काढणीच्या वेळी ज्वारीला अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता. ज्वारी भिजल्याने काळी पडली होती. गेल्या हंगामात ज्वारीची आवक कमी झाल्याने दर तेजीत होते, असे त्यांनी नमूद केले.

घाऊक बाजारातील ज्वारीचे किलोचे दर

गावरान ज्वारी – ३० ते ५८ रुपये

दुरी ज्वारी – २८ ते ३२ रुपये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोग्यासाठी ज्वारीची भाकरी खाणे हितकारक मानले जाते. गेल्या काही वर्षांपासून ज्वारीला मागणी वाढत आहे. यंदा ज्वारीची लागवड चांगली झाली. आवक चांगली होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ज्वारी स्वस्त आहे. मात्र, मागणी चांगली असल्याने दर टिकून राहणार आहेत. – शाम लोढा, ज्वारी व्यापारी, भुसार बाजार, मार्केट यार्ड