नारायणगाव : जुन्नर येथे झालेल्या एका लोक अदालतीत मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्यांना आर्थिक दंडाबरोबरच दोन वृक्षांचे रोपण करण्याची शिक्षा देण्यात आली. पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याची सर्वत्र चर्चा होत असताना पर्यावरणाला पोषक कृती करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून, या न्यायदानाची सर्वत्र कौतुकाने चर्चा होत आहे. जुन्नर येथे झालेल्या लोक अदालतीमध्ये मद्यप्राशन करून वाहन चालविण्याच्या (ड्रंक अँड ड्राईव्ह) प्रकरणांमधील ५० खटले निकाली काढण्यात आले. आरोपींकडून एकूण एक लाख २५ हजार रुपयांचा आर्थिक दंड वसूल करून प्रत्येकी दोन वृक्ष लावण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले. या अनोख्या शिक्षेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जिल्हा न्यायाधीश श्रीमती नायर यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर हुसेन, सहदिवाणी न्यायाधीश अनंत बाजड, स्वप्ना घुले आणि श्रेया जैन यांनी पॅनल जज म्हणून काम पाहिले. अनंत बाजड यांनी नवीन संकल्पना राबवून मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ ( ड्रंक अँड ड्राइव्ह केसेस) प्रमाणे शिक्षापात्र गुन्ह्यामध्ये शिक्षेबाबतच्या सौद्याचा (प्ली बार्गेनिंग) वापर करून गुन्ह्यामध्ये आरोपींना १० हजार रुपये दंडाऐवजी २ हजार ५०० रुपये दंड केला. नारायणगाव पोलीस ठाण्यातील २२, ओतूर पोलीस ठाण्यामधील १५, आळेफाटा पोलीस ठाण्यातील १० आणि जुन्नर पोलीस ठाण्यातील ३ असे एकूण ५० खटले निकाली काढून आरोपींकडून एकूण १ लाख २५ हजार रुपये आर्थिक दंड वसूल करण्यात आला.
पण, त्याचबरोबर यातील आरोपींना पर्यावरणाची सेवा म्हणून आरोपींनी वन खात्याच्या परवानगीनुसार जुन्नर वन परिक्षेत्रामध्ये वड, पिंपळ, चिंच, कडुलिंब, बेल, उंबर अशा स्वरूपाचे प्रत्येकी दोन वृक्ष लावण्याचे आदेशही देण्यात आले. या आदेशामुळे शंभर झाडांचे वृक्षारोपण केले जाणार आहे. न्यायालयाच्या या पर्यावरणपूरक स्वरूपाच्या या आगळ्या वेगळ्या न्यायदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.