पुणे : सध्या राज्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार चर्चा सुरु आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर दोन्ही गटातील नेते, पदाधिकारी समोरासमोर आले आहेत. दसरा मेळाव्यात देखील त्यांनी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप केले . अशातच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या वडगाव सहानी येथील ठाकरे – शिंदे यांच्या लग्नाची पत्रिका चांगलीच व्हायरल होत असुन यांचा शुभ विवाह सोहळा पार पडणार आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कटुता विसरून पुन्हा एकत्र यावे अशी अपेक्षा शिंदे कुटुंबाने या निमित्ताने व्यक्त केली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जुन्नरच्या वडगाव सहानी येथील विशाल शिंदेचा आंबेगाव येथील साल गावच्या अनुराधा ठाकरे हिच्याशी विवाह ठरला आहे. या निमित्ताने शिंदे आणि ठाकरे कुटुंब एकत्र येणार आहेत. त्यांची सोयरीक होत आहे. सध्या राज्यातील राजकारणात ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटात कटुता वाढताना दिसत आहे. एकमेकांवर टोकाचे आरोप केले जात आहेत. जुन्नर येथील हा विवाह सोहळा दोन्ही गटातील नेत्यांना सूचक इशारा देणारा ठरतो आहे. शिंदे कुटुंबातील कट्टर शिवसैनिक असलेले खंडेराव विश्राम शिंदे हे उद्धव ठाकरे यांचे समर्थक आहेत. त्यांनी हा विवाह सोहळा जुळवला आहे. लग्न पत्रिकेवरील ठाकरे – शिंदे यांची नवे असलेल्या विवाह सोहळ्याची लग्न पत्रिका अवघ्या पुणे जिल्ह्यात व्हायरल झाली आहे.

हेही वाचा : ‘ठाकरे, शिंदे यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी’; अजित पवार यांचे मत

शिंदे कुटुंबातील नवरदेव विशाल याने जसे आम्ही ठाकरे कुटुंबाशी जुळवून घेतले आहे . तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदेंनी हेवेदावे विसरून एकत्र यायला हवे असे मत व्यक्त केले आहे. दरम्यान, या विवाह सोहळ्याला स्थानिक आमदार, खासदार हे देखील उपस्थित राहणार आहेत. हा विवाह सोहळा दिनांक ८ ऑक्टोबर रोजी म्हणजे उद्या शनिवारी होणार आहे. ठाकरे आणि शिंदे कुटुंब या निमित्ताने एकत्र येणार आहेत त्यांचे पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी स्वागत केले आहे. यामिनित्ताने तरी दोन्ही गटातील कटुता कमी होणार का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Junnar vadgaon shinde and thackeray marriage uddhav thackeray eknath shinde come together pune tmb 01 kjp
First published on: 07-10-2022 at 12:21 IST