पुणे : कोंढव्यातील मीठानगर भागात अल्पवयीनांमध्ये झालेल्या वादातून दहशत माजविण्यात आल्याची घटना घडली. टोळक्याने मीठानगर भागातील रस्त्याच्या कडेला लावलेल्या तीन रिक्षा आणि दोन मोटारींच्या काचा फोडल्या. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत अतिक अहमद शेख (वय ४८, रा. मीठानगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिक शेख हे रिक्षाचालक आहेत. शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास तीन ते चार जण दुचाकीवरुन मीठानगर परिसरात आले. टोळक्याने गल्ली क्रमांक दोनच्या परिसरात रिक्षाच्या काचेवर कोयता आपटून काच फोडली. त्या वेळी तेथून एक माेटारचालक निघाला होता. टोळक्याने मोटारीची काच कोयत्याने फोडली. मोटारचालक खाली वाकल्याने त्याला इजा झाली नाही. मोटारीच्या दरवाज्यावर कोयते आपटून टोळक्याने दहशत माजविली. टोळक्याने परिसरातील दोन मोटारी आणि रिक्षाच्या काचा फोडल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली.

या प्रकरणी तीन अल्पवयीनांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वादातून अल्पवयीनांचा एकाबरोबर वाद झाला होता. वादातून टोळक्याने दहशत माजवून वाहनांच्या काचा फोडल्या. पसार झालेल्या एका आरोपीचा शोध सुरू आहे, अशी माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी दिली.

शहरात किरकोळ वादातून दहशत माजविण्याच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या दीड वर्षात शहराच्या वेगवेगळ्या भागात वाहनांची तोडफोड, तसेच जाळपोळ करण्याचे १४० हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. वाहनांची तोडफोड, दहशत माजविणाऱ्या सराइतांविरुद्ध पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. कारवाईचा बडगा उगारल्यानंतर शहरात तोडफोडीच्या घटना सुरू आहेत. तोडफोडीच्या घटनांमध्ये अल्पवयीनांचा समावेश आहे. गेल्या दीड महिन्यात धनकवडी, भवानी पेठेतील मंजुळाबाई चाळ, फुरसुंगी, कोंढवा भागात वाहन तोडफीडीच्या घटना घडल्या आहेत. धनकवडीत २३ जुलै रोजी टोळक्याने १५ रिक्षा, दोन मोटारी, विद्यार्थी व्हॅनची तोडफोड करण्यात आली होती .

पुणे पोलिसांच्या परिमंडळ चार आणि पाचमध्ये उपनगरे आहेत. येरवडा, विमानतळ, चतु:शृंगी, बाणेर, हडपसर, कोंढवा, वानवडी, बिबवेवाडी, लोणी काळभोर भागात वाहन तोडफोडीच्या घटना घडल्या आहे. उपनगराच्या मानाने शहराच्या मध्यभागात दहशत माजविणे, वाहन तोडफोडीचे प्रकार तुलनेने कमी आहेत. वाहन तोडफोडीच्या गुन्ह्यात अल्पवयीन सामील असल्याचे दिसून आले आहे.