पुणे : ‘कला, संगीत, साहित्य, संस्कृतीसंबंधित विविध विषयांना स्पर्श करणारे, सूक्ष्म निरीक्षण मांडणारे संदर्भश्रीमंत लेखन अरुण काकतकर यांनी केले आहे. जीवनातील आणि निसर्गातील अनेक रंग काकतकर यांच्या जीवनाचा शोध घेण्याच्या प्रक्रियेत मिसळून गेले आहेत,’ असे मत ज्येष्ठ लेखक विजय कुवळेकर यांनी व्यक्त केले.
उत्कर्ष प्रकाशनाच्या वतीने अरुण काकतकरलिखित ‘व्यक्तकं’ आणि ‘रंगांना फुटले पंख’ या पुस्तकांचे प्रकाशन विजय कुवळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे, प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, पक्षितज्ज्ञ किरण पुरंदरे, प्रकाशक सु. वा. जोशी आणि नीलिमा जोशी-वाडेकर या वेळी व्यासपीठावर होत्या.
कुवळेकर म्हणाले, ‘शब्दांविषयी विलक्षण प्रेम हे काकतकर यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. मात्र, हे शब्दप्रेम वरवरचे नाही. ते अभ्यास आणि व्यासंगातून आले आहे. शब्दांशी खेळण्याचा त्यांना छंद आहे. त्यांना विविध क्षेत्रांतील मान्यवरांना भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी लाभली. या संधीचा उपयोग त्यांनी अभ्यास, निरीक्षण अधिक सूक्ष्म करण्यासाठी केला. त्यांचे लेखन या निरीक्षणातून, अभ्यासातून, सहवासातून आले आहे. त्या मागील लेखकाची दृष्टी महत्त्वाची आहे.’
खरे म्हणाले, ‘काकतकर हे भाग्यवान निर्माते ठरले. सूक्ष्म निरीक्षण, थक्क करणारे शब्दसामर्थ्य, प्रवाही लेखनशैली हे त्यांचे विशेष दिसतात. त्यांच्या लेखनातून नवे, वेगळे शब्द परिचित होतात. सरकारी नोकरीत दीर्घ काळ असूनही त्यांच्यातील संवेदनशीलता अबाधित राहिली, हेही महत्त्वाचे आहे.’
काकतकर म्हणाले, ‘मला लेखनाची पहिली संधी ‘मनोहर’ मासिकात मिळाली. सर्वच पहिल्या गोष्टींचे महत्त्व असते. त्यामुळे मला संधी देणाऱ्या सर्वांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. योग्यता असूनही संधीविना जे मागे राहिले त्यांच्याविषयी माझ्या मनात संवेदना आहेत.’
नीलिमा जोशी-वाडेकर यांनी प्रास्ताविक केले. राधिका काकतकर यांनी आभार मानले. ऋतुजा फुलकर यांनी सूत्रसंचालन केले.
मी स्वतःला पडद्यावर प्रथम पाहिले ते काकतकर यांच्यामुळे. दूरदर्शनवरील अनेक कार्यक्रमांतून आमच्या पिढीवर उत्कृष्ट संस्कार काकतकरांसारख्या निर्माता–दिग्दर्शकांनी केले आहेत. – मृणाल कुलकर्णी, प्रसिद्ध अभिनेत्री