पुणे : विद्युत रोषणाईने उजळलेली नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिर आणि भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिर ही पालखी मुक्कामाची मंदिरे, उत्सव मंडपाची उभारणी, वारकऱ्यांचा मुक्काम असलेल्या सभागृहाची साफसफाई अशी जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली असून, शुक्रवारी (२० जून) पुण्यात येणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेची आता कार्यकर्त्यांना प्रतीक्षा आहे. वारकऱ्यांच्या स्वागताची पेठांमध्ये लगबग सुरू झाली आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संतशिरोमणी तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पालखी विठ्ठल मंदिर आणि निवडुंगा विठोबा मंदिर येथील तयारी अंतिम टप्प्यात असून, सर्वत्र चैतन्यपूर्ण वातावरण आहे. भक्तीचा हा अनुपम सोहळा प्रत्येक भाविकाला अनुभवण्यासाठी श्री पालखी विठ्ठल मंदिर परिसरात दोन एलईडी स्क्रीन बसविण्यात येणार आहेत. या माध्यमातून वारकऱ्यांसह नागरिकांना मोठ्या पडद्यावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन होणार आहे. शुक्रवारी पालखीचे आगमन झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात असतो. दोन्ही मंदिरांतील व्यवस्थापनाकडून पालखी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

निवडुंगा विठोबा मंदिराचे व्यवस्थापक आनंद पाध्ये म्हणाले, ‘पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. मंदिरात उत्सव मंडपाची उभारणी, विद्युत रोषणाई, रंगकाम, सजावट अशी विविध कामे पूर्ण झाली आहेत. सुमारे साडेतीन हजार वारकऱ्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था केली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी मंदिराच्या रंगरंगोटीसह विद्युत रोषणाई आणि उत्सव मंडप उभारले आहे. पालखी मुक्कामाच्या दिवशी दर्शनासाठी मोठी गर्दी असते. हे लक्षात घेऊन प्रत्येकाला दर्शन मिळावे, यासाठी मंदिराजवळील पालखी चौक आणि हमाल तालीम चौकात एलईडी स्क्रीन बसविण्यात येणार आहेत. त्याद्वारे भाविकांना संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन होणार आहे. त्याचबरोबर सुरक्षिततेसाठी मंदिर परिसरात ५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. या निमित्ताने आम्ही ‘हरित वारी, स्वच्छ वारी’ उपक्रम राबविणार आहोत. गोरखनाथ भिकुले, पालखी विठ्ठल मंदिर