जेजुरी : पुरंदर तालुक्यातील गुळूंचे गावचे ग्रामदैवत असलेल्या ज्योतिर्लिंग महाराजांची काटेबारस यात्रा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली. जमलेल्या हजारो भाविकांनी ‘हर भोले, हर हर महादेव’, ‘ज्योतिर्लिंग महाराज की जय’ असा जयघोष करीत गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण केली. परंपरेप्रमाणे अनेक भाविकांनी बाभळीच्या तयार केलेल्या काटेरी ढिगाऱ्यामध्ये उघड्या अंगाने उड्या मारल्या. उड्या मारल्यानंतर भाविकांना मुख्य मंदिरात नेऊन तेथे देवाचा अंगारा लावला जात होता. शेवटी उडी मारण्याचा मान असलेल्या भाविकाने उडी घेतल्यानंतर काटेरी फासाचा ढिगारा जाळून टाकण्यात आला.

गुळूंचे गावच्या ज्योतिर्लिंग महाराजांच्या यात्रेला दिवाळी पाडव्याला सुरुवात झाली. प्रतिपदेला घटस्थापना झाल्यानंतर दररोज मंदिरामध्ये काकड आरती, शिवनाम जप, ध्यान, शिवलीलामृतचे पठण, भजन ,कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम सुरू होते. घट बसल्यानंतर अनेक कुटुंबातील सदस्य उपास करतात, अनवाणी पायाने चालतात. शनिवारी पालखीतून देवाची उत्सव मूर्ती व मानाची काठी निरा नदीवर स्नानासाठी नेण्यात आली. या ठिकाणी गुळूंचे येथील श्री ज्योतिर्लिंग, कर्नलवाडीचे ज्योतिबा यांच्या उत्सव मूर्ती व देवाची बहीण असलेली काठी यांना नीरा नदीच्या दत्त घाटावर स्नान घालण्यात आले.

रविवारी पहाटे साडेतीन वाजता शिवभक्तांनी मंदिरापर्यंत दंडवत घातले. गुळूंचे गावासह बारा वाड्यातील ग्रामस्थांनी ग्रामदैवतास पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला. ढोल वाद्याचे पूजन झाल्यावर भक्त मोठ्या उत्साहाने छबिना खेळू लागले. ढोल ताशा आणि झांजेच्या गजरात पालख्यांची मिरवणूक काढण्यात आली. दुपारी बारा वाजता परंपरेप्रमाणे मानकऱ्यांनी बाभळीच्या काट्यांचे फास आणून जमा केले. काटेरी फास गोलाकार पद्धतीने मांडले गेल्यानंतर गायकवाड परिवाराने काट्यांचे पूजन केले. यानंतर ‘हर बोले,हर हर महादेव’ असा जयघोष करीत एकामागून एक भाविकांनी बाभळीच्या काट्यात उड्या घेऊन आपली श्रद्धा व्यक्त केली. त्रिपुरारी पौर्णिमेला दीप लावून या यात्रेची सांगता होणार आहे.

हा धार्मिक कार्यक्रम पाहण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते. या वर्षी दुपारी एक ते तीन या वेळात २८३ भाविकांनी काट्याच्या ढिगाऱ्यावर लोळण घेतली, काही जणांनी तर पाच ते सात वेळा उड्या मारल्या. भगवान शंकराप्रती असलेली भक्ती आधुनिक युगातही ही परंपरा गावाने जतन केली आहे.

ग्रामदैवत श्री ज्योतिर्लिंग महाराजांची ही यात्रा शंभू महादेव आणि त्यांची बहीण आसावरी यांच्या पौराणिक कथेवर आधारित आहे असे सांगितले जाते. एकदा बहीण आसावरी रुसून गेल्यानंतर तिची मनधरणी करताना भगवान शंकराने पश्चाताप म्हणून काट्यांच्या ढिगाऱ्यात लोळण घेतली. त्यानंतर शेकडो वर्षापासून काट्यांच्या ढिगाऱ्यात लोळण घेण्याची प्रथा सुरू आहे,अशी माहिती ज्योतिर्लिंगाचे निस्सिम भाविक भरत निगडे यांनी दिली.