पुणे : प्रेमाला विरोध केल्याने अल्पवयीन मुलाने साथीदारांच्या मदतीने प्रेयसीच्या मानलेल्या भावाचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी ग्रामीण पोलीस दलाच्या राजगड पोलिसांकडून तिघांना अटक करण्यात आली असून, तीन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. जुन्या कात्रज बोगद्याजवळील डोंगरावर कात्रजमधील तरुणाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणाचा राजगड पोलिसांनी तपास करून गुन्ह्याचा छडा लावला. सौरभ स्वामी आठवले (वय २५, रा. पंचरत्न सोसायटी, मांगडेवाडी, कात्रज) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या कात्रज बोगद्याजवळ डोंगरावर एका तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती तेथे फिरायला गेलेल्या नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर राजगड पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. पोलिसांनी चौकशी करून मृतदेहाची ओळख पटविली. तेव्हा मृतदेह सौरभ आठवले याचा असल्याची माहिती मिळाली. सौरभ १८ ऑगस्ट रोजी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकांनी राजगड पोलिसांकडे दिली होती. पोलिसांनी सौरभचे मित्र, नातेवाईकांकडे चौकशी केली तेव्हा खूनामागचे निश्चित कारण समजू शकले नव्हते. तांत्रिक तपासात सौरभचा खून अल्पवयीनांनी केल्याची माहिती पोलीस कर्मचारी नलावडे यांना मिळाली. आरोपी कात्रज घाट परिसरातील गोगलवाडी येणार असल्याची मााहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले.
मांगडेवाडी परिसरात अल्पवयीन त्याच्या आत्याकडे राहत होता. त्याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. सौरभ याच परिसरात राहत होता. तो मुलीला बहीण मानायचा. तो तिला दररोज शाळेत सोडायचा. त्याने मुलीच्या प्रेमप्रकरणाची माहिती आई-वडिलांना दिली. त्यानंतर अल्पवयीन मुलगा आत्याचे घर सोडून वडगाव मावळ येथे राहायला गेला. सौरभमुळे प्रेमसंबंधात अडथळे आल्याने अल्पवयीन चिडला होता. त्याने साथीदारांच्या मदतीने सौरभच्या खुनाचा कट रचला. त्यानंतर सौरभला त्यांनी कात्रज बोगद्याजवळ भेटण्यास बोलविले. सौरभला डोंगरावर नेऊन आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. पोलीस तपासात ही माहिती मिळाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून तीन मोबाइल संच आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना पोलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी, सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, उपनिरीक्षक अजित पाटील, वृषाली देसाई, पोलीस कर्मचारी सागर गायकवाड, सागर कोंढाळकर, नाना मदने, राहुल कोल्हे,अजित माने, निलेश राणे, अमोल तळपे, अजित मेस्त्री, अक्षय नलावडे, राहुल भंडाळे, मंगेश कुंभार यांनी ही कामगिरी केली.