पुणे : दुचाकीवरून अमली पदार्थ विक्री करणाऱ्या एकाला खडक पोलिसांनी भवानी पेठेतील टिंबर मार्केट परिसरात पकडले. त्याच्याकडून पावणेदोन लाख रुपयांच्या मेफेड्रोनसह दुचाकी जप्त करण्यात आली.कानिफनाथ विष्णू नायडू (वय ५१, रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पाेलीस नाईक आशिष चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायडू हा सराईत आहे. भवानी पेठेतील नेहरू रस्त्यावर खडक पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अलका जाधव, उपनिरीक्षक प्रल्हाद डेंगळे, हवालदार हर्षल दुडम, आशिष चव्हाण, इरफान नदाफ हे गस्त घालत होते. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास नायडू दुचाकीवरून नेहरू रस्त्याने टिंबर मार्केटकडे निघाला होता. पोलिसांनी त्याला पाहिले. कासेवाडीकडे जाणाऱ्या एका गल्लीत तो दुचाकीवर थांबला होता. गल्लीत अंधार होता. दुचाकीला वाहन क्रमांकाची पाटी नसल्याचे पोलिसांनी पाहिले.
त्यानंतर त्याला पकडण्यात आले. त्याची झडती घेण्यात आली असता पिशवीत पावणेदाेन लाख रुपयांचे आठ ग्रॅम मेफेड्रोन सापडले. जप्त करण्यात आलेल्या मेफेड्रोनची किंमत पावणेदाेन लाख रुपये आहे. नायडू याच्याकडून मेफेड्रोनसह २५ हजार रुपये, दुचाकी असा तीन लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गुन्हे शाखेच्या पाेलीस निरीक्षक शर्मिला सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे तपास करत आहेत.
अमली पदार्थ तस्करांविरुद्ध पोलीस आयुक्तांचा आदेश
शहरात अमली पदार्थ तस्करी, विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. कात्रजमधील आंबेगावमध्ये गांजाविक्री करणाऱ्या दोघांना नुकतेच पकडले. त्यांच्याकडून चार लाख २९ हजार रुपयांचा २९ किलो गांजा जप्त करण्यात आला. अमली पदार्थविरोधी पथकाने रविवारी बिबवेवाडी, कोंढवा भागात कारवाई करून २६ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले होेते. बुधवार पेठेत फरासखाना पोलिसांनी एकाकडून मेफेड्रोन जप्त केले होते. कोंढवा भागात अफू बाळगणाऱ्या भागीरथराम रामलाल बिष्णोई (वय ४६, रा. टिळेकरनगर, कोंढवा) याला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून १४ लाख ९८ हजारांची अफू जप्त करण्यात आली होती, तसेच बिबवेवाडी भागात अमली पदार्थविरोधी विभागाने कारवाई करून विठ्ठल ऊर्फ अण्णा रघुनाथ कराडे (वय ५७, रा. बिबवेवाडी) याला अटक करून त्याच्याकडून ११ लाखांचे मेफेड्रोन जप्त केले. बुधवार पेठेत मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या संदीप सुकनराज जैन (वय ४२, रा. भुलेश्वर, मुंबई) याला अटक करण्यात आली होती.