पुणे विद्यापीठाशी संलग्नित शंभर महाविद्यालयांमध्ये व्हच्र्युअल क्लासरूम तयार करण्याच्या प्रस्तावाला व्यवस्थापन परिषदेने रविवारी मंजुरी दिली. त्याचप्रमाणे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या नावाने विद्यापीठातील एका अष्टपैलू खेळाडूला पुरस्कार देण्याचाही निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला.
पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक रविवारी झाली. या बैठकीमध्ये विद्यापीठाच्या क्रीडा विभागाला कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचे नाव देण्याच्या प्रस्तावावर या वेळी चर्चा झाली. त्याचप्रमाणे पुढील शैक्षणिक वर्षांच्या (२०१४-१५) अर्थसंकल्पावर या बैठकीमध्ये चर्चा झाली. यावर्षीही पुणे विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाने पाचशे कोटी रूपयांचा टप्पा ओलांडला आहे. विद्यापीठाने मांडलेल्या अर्थसंकल्पाला विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने संमती दिली. यावर्षी विद्यापीठाकडून काही नव्या योजनांसाठीही तरतूद करण्यात आली आहे. विद्यापीठाशी संलग्नित शंभर महाविद्यालये व्हच्र्युअल क्लासरूमच्या माध्यमातून जोडणे, लोककला अभ्यासकेंद्राची निर्मिती करणे, या निर्णयांना व्यवस्थापन परिषदेने मंजुरी दिली. त्याचप्रमाणे विद्यापीठातील अष्टपैलू खेळाडूला कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या नावे दरवर्षी पुरस्कार देण्याचा निर्णयही घेण्यात आला.
व्यवस्थापन परिषदेने तयार केलेला अर्थसंकल्प मार्चमध्ये होणाऱ्या अधिसभेच्या बैठकीमध्ये मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. व्यवस्थापन परिषदेची पुढील बैठक ५ मार्च रोजी होणार असून त्या बैठकीमध्ये अधिसभेचे प्रश्न आणि कार्यक्रम पत्रिकेवर चर्चा होणार आहे.