पुण्यात साळुंखे विहार रस्ता परिसरातून मोटार चोरुन पसार झालेल्या चोरट्याला कोंढवा पोलिसांनी पकडले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने वाहन चोरीचे पाच गुन्हे केल्याचं उघडकीस आलं. तसेच आरोपीकडून मोटारींसह चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

राहुल उर्फ मोन्या छगन फडतरे (वय २५, रा. वडकी, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. साळुंखे विहार परिसरात मनोहर डाबी (वय ४४) यांचे किराणा माल विक्रीचे दुकान आहे. डाबी साळुंके विहार परिसरात राहायला आहे. त्यांनी घरासमोर मोटार लावली होती. फडतरेने डाबी यांची मोटार चोरुन नेली होती. या प्रकरणी डाबी यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास केला.

सापळा रचून मोटार चोरट्याला अटक

आरोपी फडतरे मोटार चोरून कोल्हापूरला गेल्याची माहिती पोलीस तपास पथकातील पोलीस कर्मचारी किशोर वळे आणि सतीश चव्हाण यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून फडतरेला अटक केली. त्याच्याकडून मोटार जप्त करण्यात आली.

हेही वाचा : पुणे : विवाह समारंभात फोटो काढायला मंचावर, भर लग्नातून वधू पक्षाकडील साडेपाच लाखांची रोकड लंपास

चौकशीत आरोपीने आणखी चार दुचाकी चोरल्याचे निष्पन्न

चौकशीत आरोपीने चार दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, गुन्हे शाखेतील निरीक्षक जगन्नाथ जानकर, गोकुळ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, निलेश देसाई, जोतीबा पवार, तुषार आल्हाट, गोरखनाथ चिनके आदींनी ही कारवाई केली.