पुणे : उपनगरात किरकोळ वादातून टोळक्याकडून दहशत माजविण्याचे प्रकार सुरू आहेत. टोळक्याने कोयते उगारून वारजे भागात दहशत माजवून १२ वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकरणी वारजे पाेलिसांनी सराईत गुन्हेगारांसह साथीदारांना अटक केली आहे.

या प्रकरणी सराईत गुन्हेगार अविनाश सुरेश गंपले उर्फ अव्या, सतीश पवन राठोड, विशाल संजय सोनकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अभिजीत विभिषण धावने (वय ३०, रा. त्रिमूर्ती सोसायटी) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा – पुणे : एनडीए रस्त्यावर मद्यविक्री दुकानावर दरोडा; मद्याच्या बाटल्यांसह रोकड लुटली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धावने हे वाहतूकदार आहेत. सोमवारी त्यांचे वडील गावाहून येणार होते. त्यांना घेण्यासाठी ते शिवाजीनगरकडे निघाले होते. सोमवारी मध्यरात्री आरोपी अविनाश, सतीश, विशाल आणि साथीदार वारजे माळवाडीतील यशोदीप चौकात आले. आरोपींनी शिवीगाळ सुरू केली. त्यांच्याकडे कोयता, बांबू होते. आरोपींनी रस्त्यात लावलेल्या मोटारी, तसेच दुचाकींची तोडफोड केली. त्या वेळी धावने हे तेथून निघाले होते. धावने यांना अडवून आरोपींनी त्यांना धक्काबुक्की केली. त्यांच्या खिशातील चार हजार रुपयांची रोकड काढून घेतली. कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. टोळक्याने परिसरातील घरांवर दगडफेक केली.

हेही वाचा – आळंदी : इंद्रायणी नदीतील जल प्रदूषणावर सामाजिक संस्था आक्रमक; नदी पात्रात उतरून आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेनंतर घाबरलेल्या धावने यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी पसार झालेल्या तीन आरोपींना अटक केली. पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राहुल ओलेकर तपास करत आहेत.