पुणे : नांदेड सिटी परिसरात मलनिस्सारण वाहिनीचे काम सुरू असताना मातीचा ढिगारा अंगावर पडून एका मजुराचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्य ठेकेदार, पोकलेन यंत्रचालक, तसेच ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राडारोड्याखाली दबलेल्या तीन मजुरांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले होते. या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला होता.

कानी भोला राम (वय ५५, रा. वडगाव बुद्रुक) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. दुर्घटनेत चेतनलाल प्रजापती (वय ३२, रा. वडगाव बुद्रुक), खुर्शीद अली (वय २७, रा. इंद्रायणी हाइट्स, नांदेड गाव) यांना वाचविण्यात यश आले होते. याबाबत नांदेडसिटी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी नेताजी कातांगळे यांनी फिर्याद दिली होती. दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या जायका प्रकल्पाच्या नदी सुधार योजनेअंतर्गत नांदेड सिटीजवळ मलनिस्सारण वाहिनीचे काम सुरू होते. त्यासाठी सात ते आठ फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता. पोकलेनने यंत्राद्वारे माती काढण्याचे काम सुरू होते. खड्ड्यात काम करणारे कामगारांचा अंगावर राडारोडा पडला. राडारोडा, मातीखाली तीन कामगार दबले गेले होते. पीएमआरडीए, महापालिका अग्निशमन तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांना मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढले होते. दबलेल्या दोन कामगारांना बाहेर काढण्यात यश आले होते. दुर्घटनेत कनीराम प्रजापती याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली. कामगारांच्या सुरक्षेविषायी पुरेशी काळजी न घेणे, तसेच त्यांना सुरक्षाविषयक साधने न पुरविल्याप्रकरणी मुख्य ठेकेदारासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक अमृता पाटील तपास करत आहेत.