करोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर यंदाच्या वर्षी गणेशोत्सव अगदी धुमधडाक्यात साजरा झाला आणि तितक्याच जल्लोषत गणरायाला निरोपही दिला गेला. मात्र मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरातील गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुका या अद्यापही संपलेल्या नाहीत. त्यामुळे यंदा विसर्जन मिरवणुकांनी जुने विक्रम मोडीत काढल्याचे चित्र आहे. पुण्यात तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक आज(शनिवार) सकाळी ११ वाजेनंतर संपली. यंदा विसर्जन मिरवणुका लांबण्यामागचे कारण नेमके काय? याची सर्वत्रच चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दगडूशेठ हलवाई गणपतीचे ट्रस्टी(कोषाध्यक्ष) महेश सूर्यवंशी यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी यामागचे कारण सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

PHOTOS : पुण्यातील पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणुकीस जल्लोषात सुरुवात; कलाकारांचेही ढोल वादन

महेश सूर्यवंशी म्हणाले, “पोलीस प्रशासनासोबत अनेक गणेश मंडळांच्या बैठका झालेल्या आहेत. आम्ही आमचा अनुभव त्यांना सांगितलेला आहे, त्यांनी देखील नियोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु काही कमतरता नियोजनात निश्चितपणे राहिलेल्या दिसत आहेत, त्यामुळेच हा विलंब झाल्याचे दिसून येत आहे.”

पु्ण्यातील विसर्जन मिरवणूक यंदा विक्रम करणार ? दुसऱ्या दिवशीही रस्त्यांवरच्या रांगा संपेनात!

याशिवाय, “यंदाचा गणेशोत्सव हा करोनाच्या दोन वर्षांच्या खडतर कालखंडानंतर झालेला आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये आणि मंडळांमध्ये दिसून आला. नऊ दिवस अत्यंत आनंदात, उत्साहात आणि भक्तीभावात व श्रद्धेने पार पडले. आजचा जो विसर्जनचा दिवस आहे, त्या विसर्जनास आम्हाला विलंब झालेला आहे. तरीदेखील गणपती बाप्पांनी भक्तांना जो दर्शनाचा लाभ दिलेला आहे. बाप्पांचा रथ जसजसा पुढे जात होता, तसे भाविक अजिबात जागचे हलले नाहीत. किंबहुना संख्या अधिकच वाढत होती. भाविका आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी आतुर होते. खूप मोठ्याप्रमाणावर भाविकांनी गर्दी केली. ” असंही सूर्यवंशी म्हणाले.

काही त्रुटी नियोजनात निश्चितपणे राहिलेल्या आहेत –

“परंतु , १३० वर्षांच्या दगडूशेठ गणपतीच्या इतिहासात सर्वात विलंब झालेली ही विसर्जन मिरवणवुकीची वेळ आहे आणि याची खंत निश्चितच वाटते. काही त्रुटी नियोजनात निश्चितपणे राहिलेल्या आहेत. जबाबदारी ही सामूहिक असते, परंतु यामध्ये संवादाचा अभाव दिसतो. अनुभवाची थोडी कमतरता वाटते, कारण दोन वर्षांच्या कालखंडानंतर या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची थोडी कमतरता जाणवली. त्यामुळे कदाचित पोलीस प्रशासन नेमकं नियोजन करू शकलं नसेल. ” अशा शब्दांत सूर्यवंशी यांनी पोलीस प्रशासनाच्या नियोजनावर बोट ठेवले.

उशीर झाला ही गोष्ट भाविकांना अजिबात खटकलेली नाही, परंतु… –

याचबरोबर, “शेवटी हा गणपती बाप्पांचा अत्यंत वैभवशाली विसर्जन मिरवणूक सोहळा आहे. संपूर्ण देशाचं लक्ष या सोहळ्याकडे लागलेलं असतं. आपल्या भारतीय संस्कृतीचा हा खऱ्या अर्थाने गौरव ठरतो. जरी विलंब झाला तरी भाविक मोठ्या संख्येने आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आतूर होते. यावरून उशीर झाला ही गोष्ट भाविकांना अजिबात खटकलेली नाही. परंतु व्यवस्थेला निश्चितपणे पुढील वर्षी योग्य नियोजनाचा विचार करावा लागेल. ” असंही देखील महेश सूर्यवंशी यांनी सांगितलं.

सुधारणा करण्यास निश्चत वाव –

तर, “विसर्जन कार्यक्रम हा वेळेत सुरू झालेला आहे. मानाच्या गणपतींची मिरवणूक निघाली मात्र मध्ये पोलिसांनी जे नियोजन केलं होतं. दगडूशेठ गणपती बाप्पाचं प्रतिवर्षी साधारण सात वाजता विसर्जन होतं, यावेळेला ते ११ वाजून २० मिनिटांनी झालेलं आहे. त्यामुळे काहीसा विलंब निश्चितच झालेला आहे.परंतु सुधारणा करण्यास निश्चत वाव आहे. ” अशी अपेक्षा सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lack of planning and coordination led to delay in immersion this year mahesh suryavanshi trustee dagdusheth msr
First published on: 10-09-2022 at 13:59 IST