आयटीएमएस यंत्रणा नादुरुस्त होण्याचे कारण

पुणे : पीएमपीच्या स्वमालकीच्या आणि ठेकेदारांकडून भाडेकरारावर घेतलेल्या गाडय़ा रात्री लावण्यासाठी जागा नसल्यामुळे पीएमपीच्या शेकडो गाडय़ा रस्त्यांवरच लावल्या जात आहेत. रात्री गाडय़ा रस्त्यावर उभ्या करण्यात येत असल्याचा फटका गाडय़ांमधील आयटीएमएस यंत्रणेला बसतो. नागरिकांकडून ही यंत्रणा नादुरुस्त केली जाते. तसेच उन्हापावसात गाडय़ा उभ्या राहत असल्यामुळेही यंत्रणा नादुरुस्त होत असल्याचा ठपका मुंबई आयआयटीने केलेल्या लेखापरीक्षणात ठेवण्यात आला आहे. दरम्यान, अप्रशिक्षित चालक, प्रशिक्षण शिबिरांचा अभाव ही कारणेही आयटीएमएस यंत्रणा नादुरुस्त होण्यास कारणीभूत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील दहा लाख प्रवाशांसाठी प्रमुख सार्वजनिक सेवा असलेल्या पीएमपीने या दोन्ही शहरांतील बीआरटी मार्गावर धावणाऱ्या गाडय़ांमध्ये आयटीएमएस यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असली, तरी यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई आयआयटीने या संदर्भात लेखापरीक्षण केले. हा तपशील माहिती अधिकारातून पुढे आला आहे. त्यामुळे आयटीएमएस यंत्रणा नादुरुस्त होण्याची काही कारणे पुढे आली आहेत. त्यात पार्किंगसाठी जागा नसणे या महत्त्वाच्या मुद्दय़ाकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

दरम्यान, पीएमपी प्रशासनाकडूनही जागा उपलब्ध नसल्याची कबुली देण्यात आली आहे. मात्र नादुरुस्त यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी पीएमपी प्रशासनाची नसून संबंधित कंपनीची आहे, असा दावा पीएमपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. पीएमपीच्या स्वमालकीच्या गाडय़ांबरोबरच ठेकेदारांच्या गाडय़ांवरील चालकांना आयटीएमएस यंत्रणेचे लॉगइन कसे करावे, हेच माहिती नाही. या यंत्रणेवर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवण्यात पीएमपी प्रशासनाला अपयश येत आहे. यंत्रणेतून प्राप्त होणारी विदा अपूर्ण आणि क्वचितच मिळणारी आहे. गाडय़ांचे मार्ग आणि संचलनाची अपूर्ण माहिती यंत्रणेत आहे.

बसगाडय़ांमधील यंत्रणेची मोडतोड

पीएमपीच्या ताफ्यात दोन हजार गाडय़ा आहेत. त्यात स्वमालकीच्या गाडय़ांची संख्या एक हजार असून उर्वरित गाडय़ा ठेकेदारांकडून भाडेकराराने घेण्यात आल्या आहेत. गाडय़ांचे संचालन झाल्यानंतर या गाडय़ा नंतर रस्त्यावरच उभ्या कराव्या लागतात. मनपा भवन, हडपसर, स्वारगेट, पुणे स्थानक, शिवाजीनगर या प्रमुख आगारांबाहेर गाडय़ा उभ्या केल्या जातात. सुरक्षेअभावी भुरटे चोर आणि काही उपद्रवी नागरिकांकडून यंत्रणेची मोडतोड करण्याचे प्रकार होत आहेत.

आयटीएमएस यंत्रणा म्हणजे काय?

प्रवाशांच्या सोयीसाठी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. आगारातून गाडी निघाल्यानंतर ती पुन्हा आगारात दाखल होईपर्यंत या यंत्रणेतून गाडीवर नियंत्रण ठेवले जाते. चालकाकडून गाडी थांब्यावर थांबविण्यात येते का, गाडी आगारातून निघाल्यानंतर इच्छित ठिकाणी पोहोचण्यास किती कालावधी लागला, आदी माहितीही नियंत्रण कक्षाला मिळते. याशिवाय प्रवाशांना गाडीच्या मार्गाची माहिती, मार्गावरील बसथांबे, बसथांबा येण्यासाठी लागणारा कालावधी याची माहितीही डिस्प्लेद्वारे मिळते.

जागांची मागणी

जकात बंद झाल्यानंतर जकात नाक्यांची जागा भाडेकराराने पीएमपीला देण्याचा निर्णय झाला आहे. शेवाळवाडी, शिंदेवाडी आणि औंध येथील जकात नाक्याची जागा देण्याचा धोरणात्मक निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र ताफ्यातील गाडय़ांची संख्या, मिडी बस, ई-बस आणि लवकरच ताफ्यात दाखल होणाऱ्या सीएनजीवरील चारशे गाडय़ा लक्षात घेता या जागाही अपुऱ्या पडणार आहेत. मध्यंतरी निगडी आगाराकडे जागा नसल्याने तेथील गाडय़ा शेवाळवाडी परिसरात ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे जागेची निकड जाणवत असून  जागा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.