बारामती: लाडक्या बहिणींना लघुउद्योग सुरू करण्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. या कर्जाचे हप्ते ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून वळते केले जाऊ शकतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. उपमुख्यमंंत्री पवार यांच्या हस्ते बारामतीतील मुढाळे येथील विद्युत उपकेंद्राचे भूमिपूजन झाले. त्या वेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारवर ४५ हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार पडत आहे.
मात्र, गोरगरीब महिलांना पैसे मिळत असल्याने त्यांना उपयोग होत आहे. दोन कोटींहून अधिक महिलांना याचा लाभ मिळत आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होत आहे. आता महिलांना लघुउद्योग सुरू करण्यासाठी ५० हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. त्याचे हप्ते हे या योजनेतून वळते केले जातील.’
‘महायुती सरकारने सौर ऊर्जा पंप योजना आणली आहे. या योजनेतून सुमारे आठ लाख आठ हजार शेतकऱ्यांना सौर पंप देण्यात आले आहेत. या योजनेसाठी २४ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पंतप्रधान सूर्यगृह योजनेंतर्गत आतापर्यंत एक लाख ३० हजार घरांसाठी ५०० मेगावॉटपेक्षा जास्त क्षमतेचे छतावरील सौर ऊर्जा संच दिले आहेत. या योजनेसाठी १ हजार कोटींपेक्षा जास्त अनुदान लाभार्थ्यांना देण्यात आले आहे,’ असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
‘बारामतीसाठी एक हजार कोटींची कामे’
‘अलीकडे बारामतीकरांना विकासकामे म्हणजे चुटकीसरशी वाटतात. मला वर्षाला पाच कोटी रुपये आमदार निधी मिळतो. म्हणजे पाच वर्षांत २५ कोटी मिळतात. तरीही शंभर दिवसांत बारामतीसाठी एक हजार कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत. त्यामुळे आता बारामतीकर लाखांत बोलायला तयारच नाहीत. ते कोटींत बोलायला लागले आहेत,’ असे अजित पवार म्हणाले.