पुणे, पिंपरी-चिंचवडलगतच्या तसेच कोल्हापूर, सासवड, सोलापूर, नगर, नाशिक, माणगाव, कोकण आणि मुंबई या भागातून येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांना पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून जावे लागते. त्यामुळे शहरांतील वाहतुकीवर त्याचा ताण पडत आहे. बाहेरून येणारी वाहने शहरात न येता बाहेरून वळविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) शहराबाहेरून हा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. या प्रकल्पाचे भूसंपादन अंतिम टप्प्यात आहे. हा प्रकल्प पूर्व आणि पश्चिम अशा दोन टप्प्यात विभागला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सहा तालुक्यांतील सुमारे ८४ गावांतून भूसंपादन करायचे आहे.
हेही वाचा >>> पुणे : शिक्षक भरतीमध्ये मराठी माध्यमासाठी किती पदे? जाणून घ्या सविस्तर…
पश्चिम मार्गाच्या एकूण ३२ गावांतील शेतकऱ्यांना संमती देण्यासाठी नोटीस देण्यात आल्या. या मार्गातील मावळ, मुळशी, हवेली आणि भोर तालुक्यातील सुमारे ६४५ हेक्टर जमिनीपैकी ३०७ हेक्टर क्षेत्र संमतीने घेण्यात आले. उर्वरित क्षेत्राचे भूसंपादनाचे निवाडे जाहीर करण्यात येऊन जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. पूर्व मार्गातील मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर तालुक्यातील एकूण ४८ गावांतील दर निश्चिती पूर्ण झाली आहे. त्यापैकी खेड तालुक्यातील १२, मावळातील सहा आणि हवेलीतील पाच गावांतील मोबदला निश्चिती करून मोबदला वाटप सुरू आहे. या प्रकल्पातील पश्चिम मार्गाच्या भूसंपादनासाठी २६२५ कोटींचा मोबदला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत झालेल्या सार्वजनिक प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी वाटप झालेल्या मोबदल्यापेक्षा हा सर्वाधिक मोबदला आहे. चालू वर्ष निवडणुकीचे आहे. लोकसभा आणि पाठोपाठ विधानसभा निवडणुका असल्याने आचारसंहितेमध्ये बराच काळ जाणार आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांत भूसंपादनाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी वेग दिला आहे.